पुण्यात पेट्रोलचा टँकर पुलावरून कोसळला (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.  

पुणे : महामार्गावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून पेट्रोल वाहतूक करणारा टँकर वारजे येथून सर्व्हिस रस्त्याने मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचे टँकरवरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला. टँकरमधील पेट्रोल रस्त्यावरून वाहत आहेत. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर खांडेकर यांनी सांगितले की,  हा टँकर सिंहगड काँलेज समोरच्या पुलावरून खाली पडला आहे. यात पेट्रोल,  डिझेल दोन्ही आहे.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, या टँकर मध्ये पेट्रोल आहे, त्यामुळे जबाबदारी घेऊन या ठिकाणी मदतकार्य सुरू केले आहे. हा अपघात सर्व्हिस रस्त्यावर झाल्याने येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली नाही. वाहतूक पोलिस आणि वारजे पोलिस ठाण्यातील अधिकारी,  कर्मचारी घटनास्थळी आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Web Title: petrol tanker collided on warje road in Pune