‘पीएचडी ट्रॅकिंग’ विद्यापीठाकडून सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी ट्रॅकिंग सिस्टिम सुरू केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची माहिती ऑनलाइन भरणे सक्तीचे आहे; परंतु काही पीएचडी केंद्रांवर ऑनलाइन प्रणालीत मार्गदर्शकांची नावे दिसत नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

महाराष्ट्रात पुणे विद्यापीठात प्रथम ही ‘ट्रॅकिंग’ प्रणाली सुरू होत आहे. त्यामुळे साडेपाच हजार विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरावी लागणार आहे. या प्रणालीमुळे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रगतीची माहिती एका ‘क्‍लिक’वर समजू शकेल. त्याने शोधनिबंध सादर केला असेल, तर तो तपासणीसाठी बाह्यपरीक्षकांकडे गेला का, मौखिक 
परीक्षेची तारीख, मार्गदर्शकाने शोधनिबंध प्रगतीचा आढावा घेतल्यास त्याचा अहवाल विद्यार्थ्याला ऑनलाइन समजेल.

विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या समस्येबद्दल विद्यापीठाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. महाविद्यालयांनी त्यांच्याकडील मार्गदर्शकांची माहिती ‘अपलोड’ केली आहे. काही महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शकांची नावे दिसत नाहीत. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. मार्गदर्शकांची नावे टाकण्यासाठी ‘लिंक’ दिली आहे. विद्यार्थ्यांना समस्या आल्यास संबंधित महाविद्यालयातील पीएचडी केंद्र किंवा विद्यापीठाशी संपर्क करावा.’’ 

Web Title: phd tracking by university