चित्रांच्या आनंददायी जगात फिरा -अवचट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - ""चित्रांचे जग आनंद देते. ते जग आपले असते, त्यामुळे मनात येईल त्या विषयाला चित्राचे रूप दिले पाहिजे. ती आपल्याला मिळालेली एक भेट असून, त्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटावा,'' असे आवाहन लेखक डॉ. अनिल अवचट यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना केले.

"पिकासो आर्ट स्टुडिओ'तर्फे भरविण्यात आलेल्या "पाचव्या पिकासो कला प्रदर्शना'च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ता दीपा देशमुख, नगरसेविका सुषमा निम्हण आणि स्टुडिओचे मिलिंद मिसाळ या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील व्यक्तींनी काढलेली चित्रे पाहायला मिळतील. सुमारे एक हजाराहून अधिक चित्रांमधून चित्रांची दुनिया उलगडण्यात आली आहे. ऍबस्ट्रॅक, वॉटर कलर, ऍक्रेलिक, ऑइल अशा चित्रकलेतील सर्व माध्यमांमधील चित्रे यात पाहायला मिळतील. व्यक्तिचित्रांपासून ते निसर्गचित्रातील वैविध्यता यामध्ये पाहता येईल. लहानग्यांनी त्यांच्या मनातील चित्रांना आकार दिला असून, तरुणाईने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चित्रे साकारली आहेत, तर ज्येष्ठांची वैविध्यपूर्ण चित्रेही प्रदर्शनात पाहता येतील.
डॉ. अवचट म्हणाले, ""प्रत्येकाने आपल्या कलेतील वैविध्यता चित्रांमधून मांडली आहे. प्रत्येकाच्या चित्राचे वेगळे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे मुलांनी चित्रे ही स्पर्धेपुरती न काढता स्वतःसाठी काढावीत.''
हे प्रदर्शन गुरुवारपर्यंत (ता. 26) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व कलादालनात पाहावयास खुले राहील.

Web Title: Picasso Art Studio