मसाल्याच्या पदार्थांपासून चित्रे

Picture
Picture

पुणे - पाने, काड्या, सुतळ्या, मसाल्याचे पदार्थ वापरून खुलवलेले रंग वेगळाच परिणाम करतात. निसर्गाची वेगवेगळी रूपे नैसर्गिक घटकांमधून साकारण्याची किमया अरविंद जोशी यांनी केली आहे. सेनापती बापट रस्त्याजवळील दर्पण आर्ट गॅलरीत सध्या त्यांचे ‘इंटरफ्युजन’ हे चित्रप्रदर्शन सुरू आहे.

प्रदर्शनातील सत्तरपैकी पन्नास कलाकृती या नैसर्गिक घटकांपासून घडवलेल्या आहेत. खराटा, केरसुणी, काडीपेटीतील काड्या, गुलमोहर व कडुनिंबाच्या झाडांच्या बारीक काड्या, काथ्या, दोरखंड, शंख, शिंपले, लाकडी मणी आदींचा वापर करून ही चित्रशिल्पे निर्माण केली आहेत. 

याबाबत माहिती देताना जोशी म्हणाले, ‘‘मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. मूळचा रत्नागिरीचा असल्याने निसर्गावर फार प्रेम आहे. नोकरीनिमित्त मुंबईत आलो. आता माझं वय ७६ आहे. तीस वर्षांपूवी भारतीय वारसा दर्शवणारी कलाकृती परदेशी पाहुण्यांच्या मागणीवरून करून दिली. ती नैसर्गिक घटकांपासून केली होती म्हणून तिचे खूप कौतुक झाले. मग हा छंदच जडला. निवृत्तीनंतर मी अशा कलाकृतीवर जास्त भर दिला. दोरखंड, सुतळी व तमालपत्र, दालचिनी यांसारखे मसाल्याचे पदार्थ वापरूनही मी विविध चित्रे तयार केली आहेत. त्यांचा पोत व रंग मला खुणावतात.’’

या प्रदर्शनात ऑइल पेंटिंग्जही आहेत. त्यांची रंगसंगतीही बघण्यासारखी आहे. अनेक लहानमोठ्या चित्रांचे हे काहीसे वेगळे जग मोहवते. मंगळवारपर्यंत (ता. २६) सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com