निहलानी, प्रभावळकर, लक्ष्मण यांचा गौरव (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. पिफ डिस्टिंग्विश पुरस्काराचे वितरण या सोहळ्यात करण्यात आले. 

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. पिफ डिस्टिंग्विश पुरस्काराचे वितरण या सोहळ्यात करण्यात आले. 

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करतात. ‘पिफ’चे हे १७ वे वर्ष असून, यंदा महात्मा गांधीजींचे १५० वे जयंतीवर्ष आहे, त्यानिमित्त ‘इन सर्च ऑफ ट्रूथ’ या थीमवर यंदाचा पिफ आधारित असेल. या वर्षी १०४ देशांमधून तब्बल १६०० चित्रपट स्पर्धेसाठी आले होते. उद्‌घाटन सोहळ्याची सुरवात ही बहारदार टॅंगो नृत्याने झाली. त्यानंतर रोहिणी हट्टंगडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

यंदाचे पिफ डिस्टिंग्विश पुरस्कार हे प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी व ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करण्यात आले, तर पिफतर्फे देण्यात येणारा एस. डी. बर्मन पुरस्कार हा संगीतकार लक्ष्मण यांना प्रदान करण्यात आला. अभिनेता सुमित राघवन आणि क्षितिज दाते यांनी सूत्रसंचालन केले. हा चित्रपट महोत्सव १७ जानेवारीपर्यंत पुण्यातील सिटी प्राइड कोथरूड व सातारा रस्ता, आयनॉक्‍स, मंगला या चित्रपटगृहांत आयोजित करण्यात आला आहे. 

पिफसाठी निधी कमी दिल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले, ‘‘दुष्काळामुळे सरकारने सर्वच खर्चात तीस टक्के कपात केली आहे. परंतु, शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाला निधी वाढून द्यावा, यासाठी प्रयत्नशील आहे.’

‘पुलं’च्या नावाने फोरमचे व्यासपीठ 
पिफकडून यंदाचे वर्ष हे पु. ल. देशपांडे, गदिमा, सुधीर फडके, नौशाद, अल्लरखा खाँ व स्नेहल भाटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. यामुळे पिफ फोरमचे प्रवेशद्वार हे गदिमा व बाबूजी (सुधीर फडके) यांना समर्पित करण्यात आले आहे; तर फोरमचे व्यासपीठ हे पुलंच्या नावाने सजविण्यात आले आहे.

पिफचे उदघाटन करताना मला खूप आनंद होतोय. तसेच मी गांधी चित्रपटात कस्तुरबांची भूमिका साकारली होती आणि यंदाचे पिफचे वर्ष हे गांधीजींचे दीडशेवे जयंतीवर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. हा खूप सुंदर योगायोग आहे.
- रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

पिफमध्ये एक सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता आहे. शासनाने केलेली मदत, ‘पिफ’च्या आयोजकांचे कष्ट यामुळे पिफ एक सकारात्मक संदेश देत आहे, मला दिलेल्या पुरस्काराबद्दल आभार.
- गोविंद निहलानी, दिग्दर्शक

गांधींजींची भूमिका साकारणे माझ्याकरीता अत्यंत आव्हानात्मक होते. यावर्षी गांधींजींच्या दीडशेव्या जयंतीवर्षात ‘पिफ’चा हा प्रतिष्ठित पुरस्कार मला मिळतोय, याचा मला आनंद होत आहे.
- दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते

Web Title: PIF Event