महाराष्ट्रातही यंदा फटाक्‍यांना बंदी घाला; पुणेकराने उच्च न्यायालयात केली याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

विशेषतः श्‍वसनाचे आजार आणि फुफ्फुसांवर थेट परिणाम झालेला आहे. असे असताना दिवाळीतील फटाक्‍यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा रुग्ण किंवा श्‍वसनाचे आजार असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो.

पुणे : कोरोना रुग्ण आणि कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना दिवाळीत उडविण्यात येणाऱ्या फटाक्‍यांमुळे फुफ्फुसाला धोका पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही राज्यांनी फटाके उडविण्यावर यंदा बंदी घातली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही यावर्षी फटाके उडविण्यावर बंदी असावी, याबाबतची जनहित याचिका सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (ता.६) दाखल केली. या याचिकेवर सोमवारी (ता.९) सुनावणी होणार आहे.

US Election 2020 : ट्रम्प यांना धक्का; पेन्सिल्वेनियात आघाडीमुळे बायडेन यांचा विजय निश्चित

पीएमपीएमएलच्या कार्यशाळेत काम करणारे कर्मचारी, महापालिकेचे सफाई कर्मचारी व वाहतूक पोलिस यांसारख्या अनेक घटकांना हवेतील प्रदूषण व दिवाळीतील फटाक्‍यांच्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका पोचतो. देशपांडे यांच्याकडून दरवर्षी संबंधित घटकांमधील कर्मचाऱ्यांची सिप्लाच्या मदतीने आरोग्य चाचणी घेऊन त्यांना आवश्‍यक औषधे पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यंदा कोरोनाचा अनेक नागरिकांच्या आरोग्याला फटका बसला आहे.

विशेषतः श्‍वसनाचे आजार आणि फुफ्फुसांवर थेट परिणाम झालेला आहे. असे असताना दिवाळीतील फटाक्‍यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा रुग्ण किंवा श्‍वसनाचे आजार असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन, अनिरुद्ध देशपांडे यांनी यावर्षी दिवाळीमध्ये फटाक्‍यांना बंदी असावी, अशी जनहित याचिका ऍड.अमित कार्ले आणि ऍड.असीम नाफडे यांच्यामार्फत मुंबईत उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली. 

महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस​

याविषयी देशपांडे म्हणाले, "पुणे शहरामध्ये फुफ्फुस किंवा श्‍वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. वाहतूक पोलिस, महापालिका सफाई कर्मचारी या अतिधोका असणाऱ्या घटकांना दिवाळीतील प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे आमच्या आरोग्य शिबीरांमधून यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यावेळी कोरोनामुळे तर फुफ्फुसांना त्रास झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फटाक्‍यांच्या प्रदूषणामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यादृष्टीने आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे. दिल्ली, कर्नाटक, राजस्थान यांसारख्या राज्यांनी यापूर्वीच फटाक्‍यांना यंदा बंदी घातली आहे. त्यादृष्टीने पुण्यासह महाराष्ट्रातही फटाके उडविण्यास बंदी असावी, अशी आमची मागणी आहे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PIL filed in Mumbai High Court seeking a ban on fireworks in Maharashtra due to corona