पिंपरी चिंचवड भोसरीमधील आमदार लागले कामाला

Vidhansabha
Vidhansabha

भोसरीत खड्डेमुक्त अभियानास सुरुवात; महेश लांडगेंनी पाळला शब्द
पिंपरी - ‘खड्डा दिसला की त्याचा फोटो काढा, आम्हाला पाठवा. आम्ही तो २४ तासांत बुजवू,’ अशा आवाहनाचे मेसेज भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मोबाईलवर मिळू लागले आहेत. खड्डेमुक्त अभियान या उपक्रमाचा हा भाग असून, आमदार महेश लांडगे यांनी तो राबवायला सुरुवात केली आहे.

पावसामुळे शहरातील काही भागांत रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे कायम आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना कसरत करून वाहन चालवावे लागते. या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम हाती घेतला आहे. भोसरीत कोठेही, कधीही, केव्हाही, रस्त्यावर किंवा आजूबाजूस खड्डा आढळल्यास परिवर्तन हेल्पलाइनवर फोटो टाकावेत, असे आवाहन नागरिकांना केले आहे. फोटो टाकल्यानंतर २४ ते ४८ तासांत समस्येचे निराकरण केले जाईल, असेही आश्‍वासन दिले जात आहे.
लांडगे म्हणाले, ‘‘खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होता. वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे पाठीचे, मणक्‍याच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. भोसरी मतदारसंघ खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.’

नव्या गृहप्रकल्पांना परवानगी देऊ नका; लक्ष्मण जगताप यांची सूचना
पिंपरी - शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये. तसेच अनधिकृत नळजोड घेतलेल्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा सूचना चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

शहराच्या विविध भागांत अनेक गृहप्रकल्प जोमात सुरू आहेत. परवानगी घेऊन उभारण्यात येत असलेल्या या गृहप्रकल्पांमध्ये सुमारे दोन लाख सदनिका पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत आणखी पाच ते सात लाखांची भर पडणार आहे. परिणामी, संपूर्ण शहरावर पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे. 

भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर आहे. मात्र ते आणण्यासाठी कालावधी लागणार आहे. तोपर्यंत योग्य नियोजनाची गरज आहे. त्यानुसार शहरात नव्याने कोणतेही बांधकाम होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. शहरात एकाही नवीन गृहप्रकल्पाला परवानगी देऊ नये. तसेच अनधिृकत नळजोड तोडण्याच्या कारवाई तातडीने सुरू करावी. अनधिकृत नळजोड घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कडक पाऊल उचलावे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशाही सूचना पत्रात आहेत.

आकुर्डीतील समस्यांविषयी संवाद; अण्णा बनसोडे यांचा पुढाकार 
पिंपरी - पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (ता. ४) आकुर्डी प्रभाग १४ मधील विविध सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आकुर्डी येथे आयोजित बैठकीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक सोसायटीतीतील नागरिकांनी त्यांना लेखी निवेदने दिली.

अनेक सोसायट्यांमध्ये अंतर्गत रस्ते, सीमा भिंत, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, पेव्हिंग ब्लॉक बसविणे अशी कामे अद्याप केलेली नाहीत. तसेच अनेक सोसायट्यांमध्ये अनियमित पाणीपुरवठा व अनियमित वीजपुरवठा आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारी मांडल्या. त्याबाबत लवकरच महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन संबंधित कामे मार्गी लावू, असे आश्‍वासन बनसोडे यांनी दिले.

या बैठकीत निरूपम हाउसिंग सोसायटी, साई पूजा बाग, मयुर समृद्धी, गंगा अपार्टमेंट, मोरया पद्मांकुर, भालचंद्र अपार्टमेंट, एन. डी. टॉवर, शुभश्री हाउसिंग सोसायटी, सीता रेसिडेन्सी, शिवदत्त रेसिडेन्सी, भक्ती देसाई हाइट्‌स, सोनिगरा क्‍लासिक आदी ४५ सोसायट्यांतील नागरिक उपस्थित होते. नगरसेवक जावेद शेख यांनी स्वागत केले. इखलास सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब पिसाळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com