पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाकडून हद्दनिश्‍चितीचे काम सुरू

सागर शिंगटे
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पूररेषा आणि नद्यांची महसुली हद्द
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने नदीपात्रालगतच्या भागांसाठी पूररेषा निश्‍चित केली आहे. या पूररेषा आणि नगर भूमापन खात्याकडील नद्यांची महसुली हद्द या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. महापालिकेने मागील कित्येक वर्षे नद्यांची महसुली हद्द निश्‍चित केली नव्हती. मात्र, नदी सुधार प्रकल्पाच्या निमित्ताने ही हद्द प्रथमच ठरविली जात आहे, असे नगर भूमापन कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पिंपरी - पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना प्रदूषणमुक्त करून त्यांचे काठ सुशोभित करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाकडून त्यांच्या हद्दनिश्‍चितीचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे नद्यांच्या पात्रालगतची अनधिकृत बांधकामे, राडारोडा, बेकायदा टाकलेले भराव आणि तात्पुरत्या स्वरूपात केलेली अतिक्रमणे उजेडात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुजरात येथील साबरमती नदीच्या धर्तीवर महापालिकेकडून पवना नदीकाठावरील किवळे ते दापोडी असे २४.५ किलोमीटर, इंद्रायणी नदीलगत देहूरोड ते चऱ्होली असे १६ किलोमीटर आणि मुळा नदीलगत राजीव गांधी पूल ते हॅरिस पुलापर्यंत साडेतीन किलोमीटरच्या टप्प्यात नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. या तिन्ही नद्यांलगतच्या क्षेत्राची मोजणी करण्याचे काम महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयावर सोपविण्यात आले आहे. 

पुणे : थेरगावमध्ये महिलेवर कोयत्याने वार 

यासाठी पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी खासगी सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामार्फत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. याअंतर्गत नगर भूमापन कार्यालयाने भोसरी आणि चिंचवड येथील नद्यांलगतच्या क्षेत्राची साधी मोजणी पूर्ण केली आहे. त्याबाबतचे नकाशे आणि अहवाल कार्यालयाकडून तयार केला जात आहे. या नकाशे आणि अहवालामुळे नदीपात्रालगतची अनधिकृत बांधकामे, बेकायदा भराव, राडारोडा व अतिक्रमणेही उघडी पडणार आहेत.

पुणे विमानतळावर चीनच्या प्रवाशाला उलट्यांचा त्रास; कोरोनाचा संशय नायडू रुग्णालयात दाखल

पुढील टप्प्यात नद्यांच्या क्षेत्रातील सहा भागांत हद्द निश्‍चित केली जाणार आहे. ही हद्द निश्‍चित झाल्यावर पालिकेला आवश्‍यक तेथे जलनिस्सारण प्रकल्प बांधून जलप्रदूषण कमी करणे, पर्यटनवाढीसाठी नदीपात्रालगत सुशोभीकरणाची कामे करणे शक्‍य होणार आहे. नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीलगतच्या क्षेत्राच्या मोजणीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील काळात या ठिकाणीही मोजणी केली जाईल, असे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

नदी सुधार प्रकल्पांतर्गत भोसरी, चिंचवड येथील नदीलगत क्षेत्राच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्यात महापालिकेला नकाशे आणि त्याबाबतचा अहवाल देणार आहोत.
- शिवाजी भोसले, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri-Chinchwad Nagar Land Acquisition Office started the work of demarcation