पिंपरी-चिंचवड महापालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या वेळी सांगितले. करामध्ये कोणतीही वाढ केली नाही.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या वेळी सांगितले. करामध्ये कोणतीही वाढ केली नाही.

महापालिकेचा मूळ अर्थसंकल्प ४६२० कोटी ७७ लाख रुपयांचा असून, खर्च ४५९० कोटी रुपये होऊन ३० कोटी रुपये शिल्लक राहतील. केंद्र व राज्य सरकारच्या योजना व अनुदानापोटी १५६२ कोटी रुपये अपेक्षित धरले आहेत. महापालिकेची जमा आणि मिळणारे अनुदान यांसह यंदाचा अर्थसंकल्प ६१८३ कोटी रुपयांचा आहे, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. 

स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्याकडे आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यापूर्वी पुलवामा येथील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीचे कामकाज दहा मिनिटे तहकूब ठेवले. त्यानंतर अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समितीची बैठक २८ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाण पूल, बोपखेल-आळंदी रस्त्याचे रुंदीकरण, रहाटणीमध्ये उच्चक्षमता द्रुतगती मार्ग, आकुर्डीतील चार रस्ते पादचारी केंद्रित पद्धतीने विकसित करणे, रावेत बंधाऱ्याचे सक्षमीकरण, आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पाणी आणण्याची योजना यांसह शहरात आयटी हब निर्माण करणे, प्राधिकरणात नवीन नाट्यगृहाची निर्मिती, पिंपळे गुरवला व्हिलेज प्लाझा आणि पिंपळे सौदागरला कोकणे चौक प्लाझा निर्माण करणे, अशा विविध योजना अर्थसंकल्पात मांडल्या आहेत. मेट्रो, बीआरटी यांसाठीही भरीव तरतूद केली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनेसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले.

हर्डीकर म्हणाले, ‘‘शहरातील नागरिकांची जीवनशैली उंचावण्यासाठी, तसेच उच्च दर्जाचे राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिका सदैव कार्यरत आहे. त्यासाठी आपण शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना केली आहे. शहर परिवर्तनाची दिशा ठरविताना शाश्‍वत वाहतूक व्यवस्था, पर्यावरण व राहणीमान, क्रीडा, पर्यटन व संस्कृती, कायदा व सुव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास या सहा क्षेत्रांचा समावेश केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी काही ठराविक क्षेत्रांत गुंतवणूक होणे गरजेचे आहे. महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली आहे.’’

‘‘एकात्मिक, सुलभ व सुरक्षित वाहतूक असलेले, तसेच निरोगी, हरित व पर्यावरणपूरक शहर निर्माण केले पाहिजे, शहराचा शाश्‍वत आर्थिक विकास झाला पाहिजे, हे मुद्दे लक्षात घेऊन विकासकामे निश्‍चित केली जात आहेत. गेल्या वर्षी पाणीपट्टीत वाढ केली. त्यामुळे यंदा करवाढ केली नाही. मात्र, करबुडवे, करचुकवे आणि अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,’’ असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘कॅश फ्लोनुसार आपण प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे या वर्षी खर्च न केलेली रक्कम त्याच प्रकल्पासाठी पुढील वर्षी उपलब्ध होऊ शकेल. भूसंपादन ८० टक्के झाल्याशिवाय काम सुरू केले जात नाही. त्यामुळे कामांसाठी निधी पुरेसा उपलब्ध होतो व ठरलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण होतो.’’

वैशिष्ट्ये
 महापालिकेच्या विकासकामांसाठी १३६३ कोटी रुपयांची तरतूद
 नावीन्यपूर्ण योजनांसाठी ११२४ कोटी रुपये
 शहरी गरिबांसाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद
 पाणीपुरवठा विशेष निधी म्हणून ८७.५ कोटी रुपये
- अमृत योजनेसाठी ७२.५ कोटी रुपये
 पीएमपीएमएलसाठी १९० कोटी रुपये
 स्मार्ट सिटीसाठी १५० कोटी रुपये
 प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ३६.३९ कोटी रुपयांची तरतूद
 नदी सुधार प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे
 अपंग कल्याणकारी योजनेसाठी ३३.१४ कोटी रुपये
 महिलांच्या विविध योजनांसाठी ४०.९५ कोटी रुपये

महत्त्वाचे उपक्रम 
 भक्ती शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर व उड्डाण पुलासाठी ३५.५२ कोटी रुपये
 मेट्रो प्रकल्पासाठी पाच कोटी रुपये
 साई चौक (जगताप डेअरी) रहाटणी येथे दोन समांतर वितलग
    बांधण्यासाठी १५ कोटी रुपये
 आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरातील चार रस्ते पादचारी केंद्रित पद्धतीने 
    विकसित करण्यासाठी २७ कोटी रुपये
 पांजरपोळ चौक ते चऱ्होली लोहगावपर्यंतचा डीपी रस्त्यासाठी 
    ५२.६३ कोटी रुपये
 रहाटणीत कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौक रस्त्यासाठी 
   सात कोटी रुपये
 बीआरटीसाठी पर्यावरण पूरक ग्रीन बससाठी दहा कोटी रुपये
 भूसंपादनासाठी १४० कोटी रुपये
 आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पासाठी २८ कोटी रुपये
 रावेत बंधारा सक्षमीकरणासाठी ५.७५ कोटी रुपये
 चिखलीला जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी
 वाकड, कस्पटे वस्ती ते पिंपरी, काळेवाडी ग्रेड सेपरेटरसाठी ६.५ कोटी रुपये
 भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक दरम्यान रस्त्यासाठी दहा कोटी रुपये
 प्राधिकरणात अद्ययावत नाट्यगृहाची निर्मिती
 अण्णासाहेब मगर स्टेडियमचा पुनर्विकास
 चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन 
   करण्यासाठी संग्रहालयाची निर्मिती
 सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करून सुरक्षिततेसाठी इंटिग्रेटेड कमांड 
   ॲण्ड कंट्रोल सेंटर
 स्टार्ट अप इनक्‍युबेशन सेंटर स्थापन करणार
 टीपी स्कीमचा वापर करून आयटी हब उभारणार
 पिंपळे गुरव येथे व्हिलेज प्लाझा
 पिंपळे सौदागर येथे कोकणे चौक प्लाझा
 बर्ड व्हॅली येथे लेझर शो
 भक्ती-शक्ती उद्यानात लाइट ॲण्ड साउंड शो
 शाहू सृष्टीची निर्मिती
 बालनगरी उभारणार
 महापालिकांच्या शाळांमध्ये ई क्‍लासरूम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad No Tax Increase Budget