आकुर्डी रुग्णालयात सुविधांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पिंपरी - महापालिकेच्या आकुर्डी येथील रुग्णालयात सध्या विविध वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. जुन्या इमारतीत हे दुमजली रुग्णालय सुरू आहे. जागा अपुरी असल्याने नूतनीकरणास अडचणी आहेत. आकुर्डीतील चर्चजवळील जागेत नवीन पाच मजली रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. तेथे अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहेत. संबंधित रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होईल.

पिंपरी - महापालिकेच्या आकुर्डी येथील रुग्णालयात सध्या विविध वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. जुन्या इमारतीत हे दुमजली रुग्णालय सुरू आहे. जागा अपुरी असल्याने नूतनीकरणास अडचणी आहेत. आकुर्डीतील चर्चजवळील जागेत नवीन पाच मजली रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. तेथे अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहेत. संबंधित रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होईल.

सद्यःस्थिती 
 खाटांची क्षमता : २६
 प्रसूतीची सोय 
 बाह्यरुग्ण व जन्म-मृत्यू नोंदणी विभाग
 फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध 
 कुटुंबकल्याण आणि राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आवश्‍यक सुविधा
 पाणी व स्वच्छतागृहाची सोय

याचा अभाव  
 दंतोपचार, डोळे, नाक, कान, घसा, हाडांच्या विकारांवरील उपचार
 अतिदक्षता, बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग
 सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, एक्‍सरे 
 पुरुष आणि बालकांसाठी स्वतंत्र विभाग

असे असेल नवीन रुग्णालय 
 अद्ययावत सुविधांचे (मल्टिस्पेशालिटी) पाच मजली रुग्णालय
 खाटांची क्षमता : १०८
 जागेचे क्षेत्र : ६५०० चौरस मीटर
 अपेक्षित खर्च : ३७ कोटी २९ लाख
 सुविधा : बाह्यरुग्ण विभाग, तपासणी कक्ष, ‘क्ष’ किरण तपासणी, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, उपाहारगृह, चोवीस तास औषधालय, शस्त्रक्रिया कक्ष, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतिगृह व नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग, सर्जिकल विभाग, डे केअर वॉर्ड. 
 सद्य:स्थिती : तीन मजल्यांपर्यंत बांधकाम पूर्ण

आकुर्डी रुग्णालयात प्रसूतिगृह व कुटुंबकल्याण केंद्रासाठी आवश्‍यक सुविधा आहेत. मात्र, जागा कमी पडत आहे. त्यामुळे विविध आजारांवरील रुग्णांसाठी सुविधा देण्यात अडचण जाणवते. नवीन रुग्णालयाचे काम वर्षभरात पूर्ण होईल. 
- डॉ. सुनीता साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी

मी काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. महिला रुग्णांना येथे चांगल्या सुविधा दिल्या जातात. 
- रूपाली सोनवणे, रुग्ण

आकुर्डी येथील रुग्णालयात जागा अपुरी पडते आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांना उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविले जाते. महापालिकेचे आकुर्डीमध्ये १०० खाटांचे नवीन रुग्णालय तयार होत आहे. काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- वैशाली काळभोर, नगरसेविका

आकुर्डी येथील रुग्णालयात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू व्हावा. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्‍यक निधीसाठी प्रयत्न केले. रुग्णालयात कार्डिॲक सेंटर, जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर व्हावे, यासाठी पाठपुरावा असेल. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष हवा. 
- प्रमोद कुटे, नगरसेवक

Web Title: pimpri news akurdi hospital facility