‘जगताप व लांडगे’ यांच्या वादात भाजपचे तीन तेरा

मिलिंद वैद्य
बुधवार, 28 जून 2017

आपण सत्तेत आहोत याचे भान सत्ता चालविणाऱ्या नेतृत्वाकडे असायला हवे. सत्तेचे वारे डोक्‍यात शिरले की, मस्ती फुरफुरू लागते. त्यातून हुकूमशाहीचा दर्प पसरतो. त्यामुळे खुर्चीवर असणाऱ्यांनी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी संयमाने, धीराने तोंड द्यायला शिकले पाहिजे. कोण डावा, कोण उजवा या मानापमान नाट्यात जनतेचा विसर पडतो. मग सत्ता हाती असूनही त्याचे तीन तेरा वाजतात. भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या हे चित्र पहायला मिळत आहे. 

आपण सत्तेत आहोत याचे भान सत्ता चालविणाऱ्या नेतृत्वाकडे असायला हवे. सत्तेचे वारे डोक्‍यात शिरले की, मस्ती फुरफुरू लागते. त्यातून हुकूमशाहीचा दर्प पसरतो. त्यामुळे खुर्चीवर असणाऱ्यांनी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी संयमाने, धीराने तोंड द्यायला शिकले पाहिजे. कोण डावा, कोण उजवा या मानापमान नाट्यात जनतेचा विसर पडतो. मग सत्ता हाती असूनही त्याचे तीन तेरा वाजतात. भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या हे चित्र पहायला मिळत आहे. 

मोठ्या कष्टाने भाजपने पिंपरी-चिंवडमध्ये सत्ता मिळवली. मात्र या सत्तेचा उपयोग जनतेसाठी खरेच किती आणि आपले मानापमान सांभाळण्यासाठी किती, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. सध्या मिळवलेली सत्ता जनतेच्या भल्यासाठी उपयोगात आणली तर? पुढील आणखी दहा वर्षे जनता ती पुन्हा तुमच्या हाती सोपवेल. मात्र, सध्या सुरू असलेली धुसफूस हातातील सत्ता घालवणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म्हणून की काय सत्तेसाठीच दूरदृष्टीने कारभार करणाऱ्यांची आवश्‍यकता आहे.

पिंपरी-चिंचवड या शहरात गेल्या काही दिवसांत जे घडले आणि घडत आहे, ते पाहिल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने इथे अंकुश ठेवण्याची आवश्‍यकता अधोरेखित होते. सध्या भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये शीतयुद्ध पहायला मिळत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सुमारे तीन महिने झाले. विकासाची कामे ज्या गतीने व्हायला हवी, तशी ती दिसत नाहीत. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांची पकड नाही. काही अधिकाऱ्यांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था आहे. नवखे नगरसेवक हताश आहेत. मर्जीतील लोकांना सांभाळताना पक्ष भरकटत चालला आहे. 

महापौरांचा मान राखा
महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्या पदाला घटनात्मक विशेष दर्जा आहे. त्यांचा मान सर्वांनी ठेवलाच पाहिजे. पण पक्षाचे काही पदाधिकारी त्यांना एकेरीत हाक मारतात, ही अशोभनीय बाब आहे. हा अवमान व्यक्तिश: त्यांचा नाही, तर तो पदाचा अवमान आहे, याचे साधे भान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नसावे. महापौरांना एकेरीत हाक मारून आपली किंमत कमी होते याची जाणीव पदाधिकाऱ्यांनी ठेवायला हवी. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘प्रोटोकॉल’ काय असतो ते आपल्या पदाधिकाऱ्यांना शिकविण्याची गरज आहे.

भोसरीची कामे का रखडली? 
सत्ता आल्यानंतर तीन महिन्यांत कामे झाली नाहीत, अशी ओरड भोसरीच्या नगरसेवकांनी केली. त्यात चूक ती काय? खरी चूक आमदार लांडगे यांची म्हणावी लागेल. महापौरपद त्यांच्या आग्रहानुसार मिळाले. विषय समित्यांमध्ये त्यांच्या समर्थकांची वर्णी लागली. तरीही भोसरीची कामे का होत नाहीत ? हे खरे गौडबंगालच आहे. इतके सारे असतानादेखील कामासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे नाक घासत जावे लागते, यातून कसा विकास होणार? भोसरीचा चेहरा कसा बदलणार? असे प्रश्‍न नगरसेवकांनाच पडले आहेत. पुढली चार वर्षे प्रश्‍न पडण्यातच गेले, तर हे नगरसेवक मतदारांना आपण केलेल्या विकासाचा पाढा काय वाचून दाखविणार, हाच खरा प्रश्‍न आहे.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष महागात 
शहरात नुकत्याच पार पडलेल्या केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनाकडे आणि त्या पाठोपाठ राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती महोत्सवाकडेदेखील पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष जगताप आणि आमदार लांडगे यांनी पाठ फिरवली, त्यांच्याबरोबर त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही काढता पाय घेतला. खासदार अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर कार्यक्रम पार पाडण्याची वेळ आली. यातून जनतेला जो संदेश मिळायचा तो मिळाला. राष्ट्रवादीची सत्ता असताना एकसूत्रीपणा होता. अजित पवार जे सांगतील तसे घडायचे. इथे पालकमंत्र्यांचेच दुर्लक्ष्य स्पष्ट दिसते. परिस्थिती अशीच राहिली तर महापालिकेचा ‘आखाडा’ व्हायला वेळ लागणार नाही. अजित पवार यांच्या विरोधात ज्या ताकदीने जगताप, लांडगे आणि आझम पानसरे एकवटले. तीच ताकद आणि एकजूट सत्तेसाठी, जनतेच्या भल्यासाठी टिकविण्याची आवश्‍यकता आहे, वरिष्ठांनी दुर्बीण घेऊन कारभारावर नजर ठेवण्याची आवश्‍यकता आहे, विकासकामांना गती देण्याची आवश्‍यकता आहे, नाही तर पुढीलवेळी जनता आपल्यालाही घरी बसवेल याची खूणगाठ बांधलेली बरी.

Web Title: pimpri news bjp politics