बोपखेल-खडकी पुलाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पिंपरी - चारही बाजूंनी लष्कराच्या हद्दीने वेढलेल्या बोपखेलमधील नागरिकांच्या सोयीसाठी मुळा नदीवर पूल उभारण्यास लष्कराकडून जागा मिळाली आहे. यामुळे बोपखेलकरांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पुलाचा प्रश्‍न लवकरच सुटण्याची शक्‍यता आहे. नियोजित पुलामुळे बोपखेल आणि खडकी जोडले जाणार आहे. 

पिंपरी - चारही बाजूंनी लष्कराच्या हद्दीने वेढलेल्या बोपखेलमधील नागरिकांच्या सोयीसाठी मुळा नदीवर पूल उभारण्यास लष्कराकडून जागा मिळाली आहे. यामुळे बोपखेलकरांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पुलाचा प्रश्‍न लवकरच सुटण्याची शक्‍यता आहे. नियोजित पुलामुळे बोपखेल आणि खडकी जोडले जाणार आहे. 

लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकीदरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित पुलाचे काम कागदावर राहिले होते. मात्र, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्लीदरबारी जाऊन पुलास लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लष्कराने पुलासाठी आवश्‍यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे. 

बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. तो पूर्ववत सुरू करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतील रस्ता कायमचा बंद केला. दरम्यान, बोपखेलकरांच्या सोयीसाठी मुळा नदीवर बोपखेल ते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा वळसा पडत आहे. बोपखेल-खडकी पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळा नदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे.

नदीवरील पूल व रस्त्यासाठी लष्कराने ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्‍यक जागा द्यावी, यासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी अनेकदा दिल्ली दरबारी जाऊन प्रयत्न केले. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरुण जेटली, विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यालाअखेर यश आले आहे. लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान पूल उभारण्यासाठी आवश्‍यक जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. ती महापालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केल्याचे संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना कळविले आहे. त्यामुळे बोपखेल आणि खडकीला जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लष्कराचे कायदे व नियम कडक असल्यामुळे बोपखेल व खडकीला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुलाला उशीर झाला आहे. मात्र, वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर या पुलाला लष्कराची आवश्‍यक जागा देण्याची कार्यवाही संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे.
- लक्ष्मण जगताप, आमदार

Web Title: pimpri news Bopkhel-Khadki bridge