निगडी ते दापोडी बीआरटी ऑक्‍टोबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पिंपरी - अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी निगडी ते दापोडी दरम्यानची बीआरटी बससेवा येत्या ऑक्‍टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. या मार्गावर बीआरटी बससेवा सुरू करण्याअगोदर त्याठिकाणी आवश्‍यक असणाऱ्या कामांची दुरुस्ती करण्याचे कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे, बीआरटीचे प्रवक्‍ते विजय भोजने यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटी बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा उपक्रम मार्गी लागू शकलेला नाही. दरम्यान, वापराविना पडून असणाऱ्या या बीआरटी मार्गाचा वापर दुचाकी वाहनांसाठी करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून ठेवण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, निगडी ते दापोडी दरम्यानचा हा बीआरटी मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. 

निगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटी मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कासारवाडी जवळ बसस्थानक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. याठिकाणी असणारी झाडे काढून ती नाशिक फाटा परिसरात लावण्यात येणार आहेत. बसस्थानक उभे करण्यासाठी तिथली झाडे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीआरटी बसस्थानकाच्या कामाला सुरवात होणार आहे. झाडे काढून ती दुसरीकडे लावण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या महापालिकेच्या सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. झाडे काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उभारण्यात येणारे बीआरटी बसस्थानक आणि प्रस्तावित मेट्रो स्टेशन, ही दोन्ही एकमेकांना जोडण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याचे भोजने यांनी स्पष्ट केले.

कासारवाडीमधील झाडे बीआरटी स्थानकासाठी काढण्यात येत आहेत. झाडे काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून या सर्व झाडांचे नाशिक फाटा येथे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. 
- सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका. 

Web Title: pimpri news BRT