रुग्णांसोबतचे नाते दृढ व्हावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

पिंपरी - एकेकाळी डॉक्‍टरला ‘देव’ म्हटले जायचे. मात्र, आता डॉक्‍टर म्हणजे ‘पैसेकाढू’, अशी समाजाची धारणा झाली आहे. डॉक्‍टर आणि रुग्णांमधील विश्‍वासाला तडा गेला आहे. त्यामुळेच की काय आजच्या डॉक्‍टरांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली असून, प्रचंड सामाजिक ताणतणावाखाली त्यांना काम करावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्‍टर आणि रुग्णांमधील नातेसंबंध सुधारणे आवश्‍यक असून, परस्परांमध्ये विश्‍वासाचे नाते दृढ होणे आवश्‍यक आहे, अशी अपेक्षा शहरातील बहुसंख्य डॉक्‍टरांनी आजच्या (ता. १) डॉक्‍टर्स दिवसानिमित्त व्यक्त केली. 

डॉक्‍टरांवरील वाढते हल्ले, हे डॉक्‍टरांवरील अविश्‍वास वाढल्याचेच द्योतक. त्यामुळेच अलीकडच्या काळात इस्पितळे आणि दवाखान्यांमधील हिंसाचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षित ‘प्रॅक्‍टिस’ करण्याकडे डॉक्‍टरांचा कल वाढत असून, अप्रत्यक्षरीत्या का होईना त्याचा भुर्दंड रुग्णांनाच सोसावा लागत आहे. अंतिमतः डॉक्‍टरांवर ‘पैसेकाढू’ असा ठपका ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या माहिती तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय सुविधा देणे अधिक सहजसोपे झाले असले, तरी डॉक्‍टरांवरील ताण मात्र दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. 

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमएस) माजी शहराध्यक्ष डॉ. दिलीप कामत म्हणाले, ‘‘एक काळ असा होता की कोणतीही आधुनिक वैद्यकीय साधने नसतानाही आम्ही आमच्या निरीक्षणातून रुग्णाला उपचार देत होतो. अर्थात तेव्हा रुग्णांचा डॉक्‍टरांवर पूर्ण विश्‍वास होता. दरम्यानच्या काळात रुग्णांच्या डॉक्‍टरांकडून अवास्तव अपेक्षा वाढल्या. दुर्दैवाने डॉक्‍टरांना त्या पूर्ण करता आल्या नाहीत. पाठोपाठ हल्ल्यांच्या घटना घडू लागल्या. काही राजकीय व्यक्तींनी मतांचे राजकारण करत त्यामध्ये हस्तक्षेप सुरू केला व डॉक्‍टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. यातून परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. बदलत्या किंबहुना जाचक होत चाललेल्या शासकीय धोरणांमुळे डॉक्‍टरांवर असलेल्या ताणतणावात भर घातली आहे.’’ 

हल्ल्याच्या घटना टाळण्यासाठी डॉक्‍टर व रुग्णांमधील संवाद वाढविण्याची गरज आयएमएसचे शहर उपाध्यक्ष डॉ. सुशील मुथियान यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, ‘‘आज समस्त डॉक्‍टरवर्ग वाढलेल्या असुरक्षिततेमुळे चिंतित आहे. डॉक्‍टरांच्या संस्था, संघटना, सोशल मीडियावरील ग्रुपमध्येही या विषयावर सातत्याने चर्चा घडते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक डॉक्‍टर आग्रही आहेत.’’ 

डॉक्‍टर परिषदा 
आतापर्यंत डॉक्‍टरांसाठी घेतल्या जाणाऱ्या परिषदांचे स्वरूप केवळ अभ्यासक्रम या दृष्टिकोनातून ठरविले जात होते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून त्यामध्ये लाइफस्टाइल मॅनेजमेंट, प्रॅक्‍टिस मॅनेजमेंट हा विषयदेखील चर्चिला जातो. अनेकदा त्याअंतर्गत मनोरंजक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते.

Web Title: pimpri news doctor day