कुत्र्यांच्या बंदोबस्ताला नियमांचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कायद्यानुसार निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, उपचार व पिसाळलेले असले तरच, भटक्‍या कुत्र्यांना पकडता येते. कुत्र्याला पकडल्यानंतर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व रेबीज प्रतिबंधक लस देऊन पुन्हा त्या भागात सोडले जाते.
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

पिंपरी - निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, उपचार किंवा पिसाळलेले असले, तरच भटक्‍या कुत्र्यांना नियमानुसार पकडता येते. अन्यथा इतर कोणत्याही कारणासाठी पकडून डांबून ठेवता येत नाही. एका भागातून पकडून दुसऱ्या भागात सोडता येत नाही. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे हाच पर्याय प्रशासनापुढे आहे. 

भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरालगतच्या माणमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा रविवारी मृत्यू झाला. गेल्या वर्षीही माण परिसरात एका बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पिंपरीतील सुखवानी कॉम्प्लेक्‍समध्ये हातात खाऊ असलेल्या मुलाचे बोट कुत्र्याने तोडले. चिंचवड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा जणांना चावा घेतला होता. त्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने त्या कुत्र्याला पकडून नेहरूनगर येथील कोंडवाड्यात ठेवले. मात्र, दुसऱ्यात दिवशी त्या कुत्र्याने धूम ठोकली. त्यामुळे प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला.

रेबीज लसीकरणाचे काय?
कुत्र्यांना दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. भटक्‍या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. त्यानंतर कुत्र्यांच्या कानाला खूण करून पकडलेल्या भागात सोडले जाते. त्यानंतर त्याला कधीच पकडले जात नाही. त्यामुळे जिवंत असेपर्यंत कुत्र्याला रेबीज प्रतिबंधक लस दिली जात नाही. मात्र, रेबीजची लागण झाल्यास ते आक्रमक बनते, असे तज्ज्ञ सांगतात.

नागरिकांच्या प्रतिक्रिया 
रहाटणी गावठाणामध्ये भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे लहान मुलांसह नागरिकांनाही जीव मुठीत धरून वावरावे लागते. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा. महापालिकेने तत्काळ याची दखल घ्यावी.
- सत्यवान शेळके, रहाटणी

चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने प्रवाशांत भीती पसरलेली असते. याबाबत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- मनोज लांजेकर

कोळवाडीफाटा मुख्य रस्त्यावर शिवतीर्थनगर सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ खाद्यपदार्थांचा कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा वावर असतो. याबाबत महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात.
- अपर्णा दलाल

संत तुकारामनगर, वल्लभनगर, नेहरूनगर, अजमेरा, वायसीएम रुग्णालय व सुखवानी कॉम्प्लेक्‍स परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा नेहमीच वावर असतो. रात्रीअपरात्री कुत्रे दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे.
- वंदना गावडे, संत तुकारामनगर

भटक्‍या कुत्र्यांना चिकन अन्‌ मटणही
शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कचराकुंड्यांवर सहज मिळणारे मटण, चिकन आणि चायनीज खाद्य. महापालिकेकडे मटण, चिकन आणि चायनीज विक्रीच्या दुकानावरील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याची माहिती समोर आली आहे.

भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे माण येथील साहिल अन्सारी या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यापूर्वी माण आणि एम्पायर इस्टेट परिसरात अशाच प्रकारे भटक्‍या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केले आहेत. गल्लीबोळात असलेली भटकी कुत्रे रात्रीच्या वेळी पादचारी, सायकल किंवा दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात. गेल्या पाच वर्षांत तब्बल ५० हजार जणांना भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. ही आकडेवारी फक्‍त महापालिकेच्या दवाखान्यात उपचार घेतलेल्यांची आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांची संख्या वेगळी आहे. यामुळे भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

शहरातील हॉटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न व ओला कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, गल्लीबोळात मटण, चिकन दुकाने आणि चायनीजच्या गाड्या आहेत. ते आपला कचरा जवळच्या कुंडीत टाकतात.

शहरातील मटण, चिकन आणि चायनीजच्या गाड्यांवरील कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा नाही. पुढील काळात अशा दुकानांवरील कचरा गोळा करण्यासाठी वेगळी तरतूद निविदांमध्ये केली जाणार आहे.
- मनोज लोणकर, सहायक आयुक्‍त, आरोग्य विभाग

शहरातील फेरीवाल्यांची नोंद महापालिकेकडे आहे. मात्र, शहरातील चायनीज गाड्यांची वेगळी नोंद नाही. 
- विजय खोराटे, सहायक आयुक्‍त, महापालिका

Web Title: pimpri news dog bandobast rules