शिक्षणाचे मंदिर झाले अवैध धंद्यांचे आगार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

विद्यार्थ्यांनी केलेले आरोप
संचालक सिगारेट पीत वर्गात येतात
संचालक त्यांच्या कार्यालयात हुक्का पितात
रात्री वर्गखोल्यांत जोडप्यांचे अश्‍लील चाळे
तक्रार केल्यास लाल शेरा 
प्राचार्य कक्ष व रोशन गार्डन कार्यालय एकच

पिंपरी - चांगल्या वातावरणात मिळणाऱ्या शिक्षणाने आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य घडवणार आहेत. मात्र, भोसरीतील जानकीदेवी ज्युनिअर कॉलेज आणि जानकीदेवी हॉटेल मॅनेजमेंट या शिक्षण संस्थेत सर्रासपणे दारूच्या पार्ट्या, सिगारेट, तंबाखू, गुटख्याचे सेवन होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नवीनच उदयाला आलेल्या या शिक्षण संस्थेत या वर्षी अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखा सुरू झाली. तर चार ते पाच वर्षांपासून हॉटेल मॅनेजमेंट ही शाखा सुरू आहे. हे ठिकाण रोशन गार्डन व हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये व्हेज, नॉनव्हेज पदार्थ; तसेच मद्यपार्टीही होत असते. लग्न समारंभ, वाढदिवसाच्या पार्ट्या, कंपन्यांचे कार्यक्रम येथे सुरू असतात. दारू, सिगारेटचे सेवन मोठ्या प्रमाणावर होते. दारूड्यांचा वावर, पार्ट्यांमध्ये झालेला कचरा, दारूच्या बाटल्या, दारू पिऊन टाकलेले ग्लास, सिगारेटची पाकिटे, तुकडे पडलेले असतात. याच परिसरात हे महाविद्यालय आहे. लग्नासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या हे वर्ग, स्टाफरूम. वर्गात शिकवणे चालू असले तरी शेजारच्या हॉलमध्ये लग्न, वाढदिवस पार्टी, कपड्यांचे सेल, कंपनी पार्टी आदी सुरू असते. हे प्रकार बंद करण्यासाठी महाविद्यालयातीलच प्रा. दत्तात्रेय लोखंडे यांनी आवाज उठवला असता, त्यांना कामावरून काढण्यात आले, असे विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. याबाबत शिक्षण संस्थेचे संचालक सुनील शर्मा यांना विचारले असता, त्यांनीही कार्यक्रमाचा हॉल व गार्डन; तसेच महाविद्यालय एकाच ठिकाणी असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत जास्त बोलण्याचे टाळले.  

आमच्या भविष्याचे काय?
याबाबत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी काहीच माहिती नव्हते. ऑगस्टमध्ये महाविद्यालय सुरू झाल्यानंतर हे प्रकार सुरू झाले. अकरावीला सुमारे ८८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यात ५० टक्के मुली आहेत. आता आमच्या भविष्याचे काय होणार, असा प्रश्‍न विद्यार्थी विचारत आहेत. कोणतेही महाविद्यालय सुरू करायचे असेल तर निदान वर्ग खोल्यांची आवश्‍यकता असते. मात्र, कोणतीही शहानिशा न करता या महाविद्यालयाला मान्यता कशी देण्यात आली. याची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. 

मी अगोदर प्रशासनाला हे प्रकार बंद करण्याची विनंती केली. महाविद्यालयाचे नाव मोठे करण्यासाठी कायमच प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने मलाच नोकरीवरून कमी केले. मला दुःख विद्यार्थ्यांचे वाटते, कारण त्यांची मने कोवळी आहेत. त्यांच्या भवितव्याचे पुढे काय होणार, याची चिंता आहे.
- प्रा. दत्तात्रय लोखंडे

Web Title: pimpri news education school