‘हॅरिस’चा समांतर पूल एक मेपासून खुला

ज्ञानेश्‍वर बिजले
बुधवार, 21 मार्च 2018

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन समांतर पूल बांधण्याचे काम वेगात सुरू असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल एक मेपासून वाहनचालकांसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या बोपोडीतील झोपड्यांचे स्थलांतर करण्यास येत्या आठ-दहा दिवसांत सुरवात होईल. त्या पुलाच्या नदीपात्रातील स्लॅबचे काम सुरू झाले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पुणे मुंबई रस्त्यावर वाहनांसाठी दहा लेन आहेत. मात्र, हॅरिस पुलावर जाताना त्यांना चार लेनमध्ये जावे लागते. बोपोडी, खडकीमध्ये २१ मीटर रुंदीचा रस्ता असल्याने तेथे रोज वाहतूक कोंडी होते. हॅरिस पुलापासून खडकी कॅंटोन्मेंटची हद्द संपेपर्यंत चार लेनचा रस्ता असल्याने तेथे सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागतात. 

दोन्ही महापालिकांनी एकत्रित खर्च करून हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूल बांधण्यास मे २०१६ मध्ये सुरवात केली. या कामासाठी २४ कोटी रुपये खर्च येणार असून, दोन वर्षे कामासाठी मुदत दिली आहे. पावसाळ्यात नदीपात्रात पाणी असल्याने काम थांबले होते. झोपड्यांचे स्थलांतरही लांबले. त्यामुळे पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या पुलाचे काम आणखी तीन-चार महिन्यांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

पुलाच्या जागी बाधित २६६ झोपड्या आहेत. त्यांना हडपसर व वारजे येथे घरे देण्यात येतील, तर औंधला भाडेतत्त्वावर घर दिले जाईल. या घरांसाठी गुरुवारी (ता. २२) सोडत काढण्यात येईल. तेथील झोपड्या पाडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती जागा रिकामी करण्यात येईल. त्यामुळे बोपोडी चौकापर्यंतची जागा मोकळी होईल. 
- संदीप कदम, सहायक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका

पिंपरीकडून पुण्याकडे जाणाऱ्या नवीन पुलावरील वाहतूक एक मेपासून सुरू करण्यात येईल. त्यादृष्टीने तेथील कामाचे नियोजन केले आहे. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या दुसऱ्या पुलाचे नदीपात्रातील काम सुरू केले आहे. तेथील झोपडपट्टीचे स्थलांतर केल्यानंतर त्या जागी दोन खांब उभे करण्यात येतील. समांतर पूल झाल्यानंतर तेथील वाहतूक कोंडीची समस्या संपेल.
- राजन पाटील, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

Web Title: pimpri news haris parallel bridge