अल्प उत्पन्न गटासाठी १००० घरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पिंपरी - मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी काम सुरू करण्यास आणि इंद्रायणीनगरमध्ये (भोसरी) आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी एक हजार घरे बांधण्यासाठी आराखडा करण्यास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

पिंपरी - मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी काम सुरू करण्यास आणि इंद्रायणीनगरमध्ये (भोसरी) आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी एक हजार घरे बांधण्यासाठी आराखडा करण्यास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

विभागीय आयुक्त आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे ही बैठक झाली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्यासह अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीतील निर्णयाविषयी खडके यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मोशीतील अकरा हेक्‍टर जागेवर पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. तेथील जागेचे सपाटीकरण करून, संरक्षक भिंत बांधण्यात येईल. त्यासाठी नऊ कोटी ५४ लाख रुपयांच्या खर्चाला अंदाजपत्रकीय मान्यता देण्यात आली. ही कामे झाल्यानंतर तेथे खुले प्रदर्शन भरविण्यासाठी जागा देता येईल.’’

गृह प्रकल्पाविषयी ते म्हणाले, ‘‘प्राधिकरणाच्या सेक्‍टर सहामध्ये (इंद्रायणीनगर) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक हजार घरे बांधण्याच्या योजनेला बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल. सेक्‍टर सहामध्ये पाणीपुरवठा टाकी बांधण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली.’’ प्राधिकरणासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक कामांच्या मान्यतेसाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार तांत्रिक मान्यतेचे अधिकार अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांना तर २५ लाख रुपये खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी समिती स्थापन करण्यात मान्यता देण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनासाठी यंत्रसामग्री भाड्याने घेण्यासाठीचे नवे दर निश्‍चित करण्यात आले, अशी माहितीही सतीशकुमार खडके यांनी दिली.

‘आगारासाठी जागेसंदर्भात प्रस्ताव सादर करा’
पीएमपीएमएलच्या आगारासाठी रावेत आणि इंद्रायणीनगर येथे जागा मागण्यात आली आहे. अशा जागा हस्तांतरण करण्यासाठीचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात तपशीलवार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. महापालिकेच्या अग्निशामक दलासही दोन ठिकाणी केंद्र उभारणीसाठी जागा हवी आहे. त्याचाही अंतर्भाव या प्रस्तावात करण्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: pimpri news home Low income group moshi bhosari