राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी काळभोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

करून दाखवेन 
शहरामध्ये महिला संघटन मजबूत करण्याकडे लक्ष देईन. मी कायद्याची पदवीधर असल्याने त्या ज्ञानाचा वापर करून अधिकाधिक महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. बोलून दाखविण्यापेक्षा करून दाखविण्यावर माझा भर असेल, अशी प्रतिक्रिया वैशाली काळभोर यांनी निवडीनंतर दिली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नगरसेविका वैशाली काळभोर यांची बुधवारी एकमताने निवड करण्यात आली. संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुंबईत ही घोषणा केली. 

गेल्या सात महिन्यांपासून हे पद रिक्त होते. याबाबत बुधवारी मुंबईत बैठक झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील बैठकीला उपस्थित होते. 

काळभोर या कायद्याच्या पदवीधर असून, प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, चिंचवड स्टेशनच्या नगरसेविका आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. महापालिकेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव असून, पक्षातील महिला कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तत्कालीन शहराध्यक्षा सुजाता पलांडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्या नगरसेविका झाल्या. सुरवातीच्या काळात या पदावर कासारवाडीच्या सुरेखा लांडगे  होत्या. तेव्हापासून म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून हे पद रिक्त होते. काळभोर यांच्या निवडीबद्दल पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्षपद अजूनही रिक्त आहे.

Web Title: pimpri news ncp vaishali kalbhor