दरमहा सहा हजार लिटरपर्यंत चक्क मोफत पाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पिंपरी- नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा हजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी स्थायी समिती सभेत घेऊन शहरवासीयांना नववर्षाची भेट दिली. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. 

पिंपरी- नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा हजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी स्थायी समिती सभेत घेऊन शहरवासीयांना नववर्षाची भेट दिली. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. 

महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून तो बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे अध्यक्षस्थानी होत्या. या प्रस्तावावर सभेत चर्चा झाली. पाणीपट्टीवाढीसाठी प्रशासनाने प्रस्तावित केलेले दर जास्त असल्याच्या भावना सावळे व समितीच्या इतर सदस्यांनी व्यक्त केल्या; परंतु पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी तफावत असल्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे मत प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आले. 

असा झाला निर्णय 
स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांनी महापालिकेने नळजोडाला मीटर असलेल्या प्रतिकुटुंबाला दरमहिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत द्यावे, अशी सूचना केली. त्याला समितीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे एक एप्रिल 2018 पासून प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत दिले जणार आहे. 

सीमा सावळे म्हणाल्या... 
- नवीन निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा कमी वापर करणाऱ्यांना फायदा 
- नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी 
- कमीत कमी पाण्याचा वापर करून मोफत पाणी निर्णयाचा लाभ घ्यावा 

वार्षिक खर्चाची कारणे 
- रावेत येथील पवना नदीच्या बांधावरून पाणी उचलणे 
- पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणे 
- शुद्ध पाण्याचा नागरिकांना पाणीपुरवठा करणे 
- मीटर रीडिंगनुसार पाण्याची बिले तयार करणे 
- पाणीबिलांचे नागरिकांना वाटप करणे 

प्रशासनाचे स्पष्टीकरण 
पाणीपुरवठ्यावर वार्षिक खर्च : 109 कोटी 
पाणीपट्टीपोटी अपेक्षित वसुली : 34 कोटी 
वास्तविक जेमतेम वसुली : 25 कोटी 
पाणीपुरवठ्यावर वार्षिक तोटा : 85 कोटी 

"स्थायी'नुसार दरमहा 
नवे पाणीवापराचे दर 
- 6001 ते 15 हजार लिटर : प्रतिहजार लिटर 8 रुपये 
- 15,001 ते 22,500 लिटर : प्रतिहजार लिटर 12.50 रुपये 
- 22,501 ते 30 हजार लिटर : प्रतिहजार लिटर 20 रुपये 
- 30,001 लिटर पुढील पाणीवापर : प्रतिहजार लिटर 35 रुपये 

मीटर रीडिंगप्रमाणे दरमहा पाणीपट्टी 
- प्रतिकुटुंब : शंभर रुपये 
- झोपडपट्टी प्रतिजोड : 50 रुपये 
- हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने : प्रतिहजार लिटरसाठी 50 रुपये 
- खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्थानके, रुग्णालये व वसतिगृह : प्रतिहजार लिटरसाठी 15 रुपये 
- धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय आयुक्त मान्यताप्राप्त संस्था, ना नफा ना तोटा तत्त्वावरील मंडळे, महापालिका इमारती व मिळकती ; प्रतिहजार लिटरसाठी 10 रुपये 
- स्टेडियम : प्रतिहजार लिटरसाठी 20 रुपये 
(टीप : उपरोक्त दर आकारण्याचे प्रशासनाकडून प्रस्तावित होते. त्यात स्थायी समितीने कोणतेही बदल केलेला नसल्याचे सीमा सावळे यांनी सांगितले.)

Web Title: pimpri news pcmc water