रॅगिंग, रोडरोमिओंविरोधात ‘पोलिस काका’

संदीप घिसे
शनिवार, 29 जुलै 2017

पिंपरी  - शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होतो. काही विद्यार्थ्यांबाबत रॅगिंगचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘आयटी’तील ‘बडिकॉप’च्या धर्तीवर शाळा- महाविद्यालयांत पोलिसांकडून ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येणार आहे.

पिंपरी  - शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होतो. काही विद्यार्थ्यांबाबत रॅगिंगचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘आयटी’तील ‘बडिकॉप’च्या धर्तीवर शाळा- महाविद्यालयांत पोलिसांकडून ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येणार आहे.

रॅगिंग किंवा रोडरोमिओंचा त्रास कमी करण्याविषयी महाविद्यालयांत पोलिस अधिकारी व्याख्याने देतात. शाळा- महाविद्यालय परिसरात पोलिस गस्त घालतात. अनेकदा रोडरोमिओंवर कारवाईही झालेली आहे. मात्र, केवळ कारवाई पुरेशी ठरत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी दामिनी ब्रिगेडची स्थापना केली. या पथकाने वेळोवेळी रोडरोमिओंची धुलाई केलेली आहे. 

वाकडमध्ये तीन एप्रिलला एका आमदाराच्या मुलीवर खुनी हल्ला झाला होता. त्यापूर्वी मुलीने महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. महाविद्यालयाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. अन्य विद्यार्थिनींनाही अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. रोडरोमिओंकडून त्रास दिला जातो. असे प्रकार पोलिस गस्त व दामिनी ब्रिगेडमुळेही पूर्णपणे थांबू शकले नाहीत. शहरातील महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता हे पथक पुरेसे नसल्याचे स्पष्ट झाले. रॅगिंग व रोडरोमिओंचा त्रास असे प्रकार भविष्यात घडू नयेत, यासाठी पोलिसांनी ‘बडिकॉप’च्या धर्तीवर ‘पोलिस काका’ची निर्मिती केली आहे.

‘पोलिस काका’ योजनेसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात पाच पोलिस नियुक्‍त केलेले आहेत. ते सुरवातीला दररोज शाळेला भेट देतील. तेच पोलिस काका होत. त्या पोलिस काकांचे छायाचित्र व मोबाईल क्रमांक शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत. तसेच, हे पोलिस काका वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या संपर्कातही राहणार आहेत. यामुळे रोडरोमिओंचा त्रास आणि रॅगिंगसारख्या प्रकारांना आळा बसेल, असा विश्‍वास पोलिसांना आहे. याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये जनजागृती करण्यास सुरवात झाली आहे. आयटी क्षेत्रातील ठराविक महिलांची जबाबदारी एका पोलिसाकडे दिलेली आहे. त्यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केलेला आहे. समाजकंटकांकडून होणारा त्रास किंवा तातडीची मदत पाहिजे असल्यास त्या महिलेने आपल्या पोलिसमित्र बडिकॉपला सांगायचे आणि त्यांनी त्वरित योग्य ती कार्यवाही करायची, अशी संकल्पना आहे.

पोलिस काका ही शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. त्यांची पोलिसांशी एक मित्र या नात्याने जवळीक वाढेल, या उद्देशाने पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्या संकल्पनेतून पोलिस काका योजना सुरू केली आहे.
- राम मांडुरके, सहायक आयुक्‍त

Web Title: pimpri news police