आवास प्रकल्प कासवगतीने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

संबंधित कंपनीचे काम समाधानकारक नसल्यानेच त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. त्यात सुधारणा न झाल्यास कंपनीचा थेट काळ्या यादीमध्ये समावेश केला जाईल.

सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

पिंपरी - वाल्हेकरवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हाती घेतलेल्या गृहप्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने औरंगाबाद येथील एलोरा कन्स्ट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला दरदिवसाला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या बिलातून हा दंड वसूल करण्यात येणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी पेठ क्रमांक ३० व ३२ मध्ये वाल्हेकरवाडी येथे स्पाइन रस्त्यालगत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. पर्यावरण विभागाच्या कचाट्यात अनेक महिने अडकलेल्या या प्रकल्पाला २०१५ च्या अखेरीला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये निविदा काढून हे काम औरंगाबादच्या एलोरा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले. त्यासाठी चार वर्षांच्या मुदतीत ७९२ सदनिका बांधण्याचे बंधन घालण्यात आले. शहरातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हा पहिलाच प्रकल्प असून ४.८५ हेक्‍टर जागेत एकूण ५५ विंग्ज (१३२ इमारती) उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी ७९.६९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून प्रत्येक सदनिकेसाठी दीड लाख तर राज्य सरकारकडून एक लाख रुपये असे १९ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. वन-बेडरूम किचन व वनरूम किचन अशा दोन प्रकारांत सदनिका बांधल्या जाणार आहेत. मात्र गेल्या दीड वर्षात एक व दोन विंगचा केवळ पाया भरून कॉलम उभे करण्यात आले. सध्या कामाचा वेग पाहता निर्धारित चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. 

त्यामुळे या कामाची तपासणी करून प्राधिकरणाने काम संथगतीने सुरू असल्याबद्दल कंपनीला प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रुपये असा दंड आकारला आहे. दंडाची ही रक्कम कंपनीला देण्यात येणाऱ्या बिलातून वसूल केली जात आहे. या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली असता काम बंद होते. ईदनिमित्त कामगार औरंगाबादला गेल्याने काम बंद ठेवले आहे. दोन-चार दिवसांत कामगार कामावर परतले की कामाचा वेग वाढेल, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले.

Web Title: pimpri news Pradhan Mantri Awas Yojna