अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या दांपत्याला हवंय घर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे. 

पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे. 

ही कहाणी आहे पूनम नाईक व सुजितकुमार नाईक या दांपत्याची. सुजितकुमार नाईक हे १७ डिसेंबर १९८२ रोजी पिंपरीतील विशाल थिएटरजवळून न्यायालयामार्फत पुण्यातील जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या बालगृहात दाखल झाले. पाचवीपर्यंतचे शिक्षण शिवाजीनगरमधील महापालिकेच्या शाळेत झाले. पुढील शिक्षण पंढरपूरमधील (जि. सोलापूर) वासुदेव बाबाजी नवरंगे बालकाश्रम व मुंबई येथील द. ना. सिरूर बालकाश्रमात झाले. मुंबईतील बालकाश्रमात जेवणाची सुविधा व्यवस्थित नसल्याने ते संस्थेतून बाहेर पडले. त्यानंतर सिनेअभिनेते दिलीप कुमार यांच्या घरी काम मिळाले. काही महिने काम केल्यानंतर एकाने जम्मू-काश्‍मीरमध्ये एका कपड्याच्या दुकानात कामाला नेले. त्या ठिकाणी सुमारे तीन वर्षे त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेण्यात आली. सैनिकांच्या मदतीने सुटका झाल्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठले. स्क्रीन पेंटिंगचे काम सुरू केले. दरम्यान, त्यांचा पुन्हा आश्रमाची संपर्क आला. आश्रमाने त्यांचे लग्न बारामती येथील महिला स्वीकार केंद्रातील पूनम यांच्याशी लावून दिले. लग्नानंतर ते भाड्याच्या खोलीत राहू लागले. सध्या त्यांना तीन वर्षांची मुलगी असून, ते भोसरीत भाड्याच्या घरात राहतात. सध्या हक्काचा निवारा मिळवण्यासाठी त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांना शिफारस करूनही तेथील प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. डिजिटलमुळे स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय डबघाईला आला आहे. उत्पन्न कमी झाले आहे. त्यात घर चालवणे कठीण झाले आहे.
- सुजितकुमार नाईक     

घरकुल योजनेचे लाभार्थी निश्‍चित झाले असल्याने सुजितकुमार नाईक यांना घर मिळणे कठीण आहे. मात्र, विशेष योजनेतून त्यांना घर देता येईल का, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
- योगेश कडुसकर, सक्षम प्राधिकारी, पालिका.

Web Title: pimpri news pune news sujitkumar naik home anathashram help