पिंपरी शहरात दमदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

धरण परिसरात विश्रांती 
पवना धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. धरण 100 टक्‍के भरले आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये धरणातून थोडे थोडे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याचे पवना धरणाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी सांगितले. 

पिंपरी - अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार आगमन केले आहे. शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. सोमवारी रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे शहरातल्या रस्त्यावर पुन्हा खड्‌डे पडले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. 

पावसाने अनेक दिवसांपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. शहरात पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. 

सोमवारी रात्रीपासून अखंडपणे बरसणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, भोसरी या भागांतील रस्त्यावर खड्‌डे पडल्याचे चित्र दिसले. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. 

Web Title: pimpri news rain