रिंगरोडवरून गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पिंपरी - शहरातून जाणाऱ्या रिंगरोडच्या प्रश्‍नावर गुरुवारी (ता. २०) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ उडाला. रिंगरोडबाबत सभा संपल्यानंतर चर्चा करण्यास संधी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम आक्रमक झाल्या. त्यांनी महापौर नितीन काळजे यांना ‘भित्रा’ म्हणून संबोधले. तर ‘मी कोणाच्या दबावाखाली काम करीत नसून मी भित्रा नाही,’ असे प्रत्युत्तर काळजे यांनी दिले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झडली. या गोंधळातच सभा गुंडाळण्यात आली.

सभा कामकाज सुरू झाल्यानंतर रिंगरोडच्या प्रश्‍नाबाबत बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. तसेच, सभेसमोरील विविध विषयांना दिल्या जाणाऱ्या उपसूचनांबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. काळजे यांनी सभेतील सर्व विषय संपल्यानंतर बोलण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले. सभेसमोरील विषयांबाबत निर्णय झाल्यानंतर सभा समारोपाच्या प्रसंगी रिंगरोडच्या प्रश्‍नावर चर्चा घ्यावी, अशी मागणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उचलून धरली. त्यानंतर, मंगला कदम यांना बोलण्यास संधी देण्यात आली. त्या म्हणाल्या, ‘‘महापौर, तुम्ही दबावाखाली काम करीत आहात. तुम्ही भित्रे आहात.’’ त्यावर, ‘‘माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मला कोणीही शिकवू नये. विषय सोडून बोलू नका. मी भित्रा नाही,’’ असे प्रत्युत्तर काळजे यांनी दिले. ‘‘रिंगरोडच्या प्रश्‍नाबाबत चर्चा होऊ द्या,’’ असे मत बहल यांनी व्यक्त केले. 

माफी मागणार नाही - कदम
‘‘महापौरांविषयी असंसदीय शब्दाचा वापर झाला आहे. त्याबद्दल कदम यांनी माफी मागावी. त्यानंतरच चर्चा करावी,’’ अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे यांनी घेतली. मात्र, ‘‘माफी मागण्यासारखे मी काहीही चुकीचे बोलले नाही,’’ असे स्पष्ट करीत कदम यांनी या प्रश्‍नावर चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मात्र, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि सावळे यांनी सभा संपविण्याची मागणी केली. अखेरीस सभेचे कामकाज आटोपण्यात आले.

Web Title: pimpri news ring road pcmc