‘सकाळ’मुळे आयुष्याला कलाटणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मदतीसाठी बँकखाते...
‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यांच्या हस्ते रोझमेरी यांच्याकडे मदतीची रक्कम सुपूर्द करण्यात आली. ‘सकाळ’ची बातमी ऑनलाइन वाचल्यानंतर अनेकांची रोझमेरी यांच्या बॅंक खाते व आयएफएससी क्रमांक मागितला. तो वाचकांकरिता देत आहोत. एसबीआय बॅक ः खाते क्रमांक ३४४८१५३५८०९ आयएफएसआय ः SBIN००१४५७८.

पिंपरी - मुलीच्या शाळेची फी भरायची कशी, शस्त्रक्रियेला पैसे कोठून आणायचे, शस्त्रक्रियेला सुटी घेतल्यास घर कसे चालवायचे, कदाचित आपल्याला काही झाल्यास मुलगी आणि आई-वडिलांकडे कोण पाहणार? असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर होते. नैराश्‍य येत होते; मात्र ‘सकाळ’मध्ये माझ्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आणि आयुष्यालाच कलाटणी मिळाली. एका दिवसात सर्व समस्यांचे निराकरण झाले. जीवनाच्या निर्णायक क्षणी ‘सकाळ’ पाठीशी उभा राहिला. यामुळे मी ‘सकाळ’चे सदैव ऋणी राहीन, अशी भावना रोझमेरी जोसेफ यांनी व्यक्‍त केली.

‘होय, मला जगायचंय कुटुंबासाठी’ ही रोझमेरी यांची कैफियत मांडणारी बातमी सहा नोव्हेंबर रोजी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक विभागाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महेश बेंजामिन यांनी रोझमेरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आमदार बाळा भेगडे मित्रपरिवारातर्फे भरीव मदतीचे आश्‍वासन दिले. तसेच रोझमेरी यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून तळेगाव येथे स्थलांतरित केले जाईल. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया व मुलीचे संपूर्ण शिक्षण केले जाईल. रोझमेरी यांना आपल्या भावाच्या कंपनीत तात्पुरती नोकरी व त्यांच्या वडिलांना हॉटेलमध्ये रोखपालाची नोकरी, राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही बेंजामिन यांनी सांगितले.

रोझमेरी यांना मिळालेली मदत
 माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्याकडून दहा हजार रुपये   फत्तेचंद जैन महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या एसएफजेकेपी या व्हॉट्‌सॲप ग्रुपवरील राहुल सायकर व शीतल ठोकळ यांच्या पुढाकारातून ग्रुपमधील सदस्यांकडून दहा हजार रुपये  रोझमेरी यांची मुलगी जॉइसला शाळेत जाण्यासाठी महालक्ष्मी मोटार्सचे मालक उमेश चौधरी यांच्याकडून नवीन सायकल भेट  नगरसेवक कैलास बारणे यांच्याकडून पाच हजार रुपये   ‘सकाळ’च्या एका वाचकाने ११, तर दुसऱ्या वाचकाकडून एक हजार रुपये   दत्ता वालगुडे यांच्याकडून दोन हजार रुपये  रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे एम. ए. हुसरे यांनी सांगितले, की रोझमेरी यांच्या औषधोपचाराकरिता दरमहा दोन हजार रुपये वर्षभर दिले जातील. दोन महिन्यांच्या रकमेचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द   अजमेरा कॉलनीतील अमोल वारुळे यांच्याकडून दीड हजार रुपये  रंजना संचेती यांच्याकडून साडेतीन हजारांचा धनादेश.

Web Title: pimpri news sakal news impact