उदंड प्रतिसादात ‘सकाळ वास्तू’चा समारोप

उदंड प्रतिसादात ‘सकाळ वास्तू’चा समारोप

पिंपरी - ‘सकाळ’च्या वास्तू प्रदर्शनाच्या माध्यमातून खरोखर सर्वोत्तम गृहखरेदीचा पर्याय उपलब्ध झाला आहे... ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती वास्तू प्रदर्शनाला भेट देणाऱ्या एका पिंपरी-चिंचवडकर दाम्पत्याची. शनिवारपासून (ता. ७) सुरू असलेल्या ‘सकाळ’च्या वास्तू प्रदर्शनाचा आज (ता. ८) समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला शहरातील असंख्य ग्राहकांनी भेट दिली. 

धावपळीच्या युगात सर्वसामान्यांची स्वप्नातील घर शोधताना दमछाक होऊ नये, या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर हॉलमध्ये गृहविषयक ‘सकाळ-वास्तू’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीही पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात चाळीसहून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सादर केलेले ‘महारेरा’ नोंदणीकृत २०० हून अधिक उत्कृष्ट गृहप्रकल्प खरेदीदारांना पाहता आले. परवडणाऱ्या दरातील गृहप्रकल्पांचे काहींनी ‘स्पॉट बुकिंग’ही केले. 

आज रविवार असल्याने सकाळपासूनच नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर गृहखरेदीचा योग साधत आज दिवसभरात फ्लॅट आणि प्लॉटचे स्पॉट बुकिंग प्रदर्शनस्थळी करण्यात आले. एक्‍स्पोत शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह औंध बाणेर, वाकड अशा विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पांची चौकशी खरेदीदारांना करता आली. तसेच तळेगाव ढमढेरे, चाकण असे पुण्याजवळील गृहप्रकल्पांचे विविध पर्यायही खरेदीदारांच्या पसंतीस उतरले. आयटीतील नोकरदारांना रावेत, किवळे, वाकड आणि हिंजवडी येथील गृहप्रकल्पांची माहिती घेता आली. प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर साकारले. अनेकांनी आपल्या कुटुंबासमवेत प्रत्येक स्टॉलला भेट दिली. गृहप्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘ऐश्‍वर्यम हमारा’ होते. 

या एक्‍स्पोत गृहप्रकल्पांची मोठी शृंखला पाहायला मिळाली. हव्या त्या परिसरात वन बीएचकेपासून ते कार्यालयापर्यंतचे उत्कृष्ट पर्याय उपलब्ध करून दिले होते. सोयीसुविधा, सुरक्षेची हमी आणि गुणवत्ता हे या गृहप्रकल्पांचे वैशिष्ट्ये ठरले. रिअल इस्टेटशी निगडित ‘होम लोनपासून फायनान्स’पर्यंतच्या सर्व प्रश्नांबाबतच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

ग्राहक म्हणतात... 
नागरिकांना आपल्या स्वप्नातील घर साकारता यावे, यासाठी काही वर्षांपासून वास्तू प्रदर्शनाचा स्तुत्य उपक्रम ‘सकाळ’ राबविते, हे सर्वसामान्यांसाठी जमेची बाजू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घर साकारलेले आहे. वाकड, किवळे या मध्यवर्ती ठिकाणातील ‘वनबीएचके फ्लॅट’ प्रोजेक्‍ट चांगले आहेत.
- महेश तळेकर

प्रदर्शनातील प्रकल्पांचे रेट सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील आहेत. साइट व्हिजिटची सोय उपयुक्त आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रदर्शनात नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
- राजेश्‍वर अष्टंगे

गृहकर्ज आणि बजेट होमपासून लक्‍झरी, अल्ट्रा लक्‍झरी होम्सपर्यंतचे विविध पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक उत्कृष्ट गृहप्रकल्पांची शृंखला पाहायला मिळाली. बहुतांशी बिल्डरांनी चांगल्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. आम्हाला अपेक्षित रावेत, किवळे, मोशी परिसरातील गृहप्रकल्पांची चांगली माहिती मिळाली.  
- नेहा बडगुजर

‘सकाळ’च्या वास्तू प्रदर्शन खरोखर सर्वोत्तम गृहखरेदीचा पर्याय उपलब्ध होत आहे. अशा प्रदर्शनामुळे ग्राहकांची धावपळ थांबते आणि सर्व गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळते, हे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. दिवाळीच्या मुहूर्तावर या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी गृहखरेदीचा योग साधला आहे.
- ममता देशमुख

बजेट होमपासून ते अल्ट्रा लक्‍झरी होम्सपर्यंतचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ‘सकाळ’ वास्तू ग्राहकांसाठी पर्वणी ठरली. या प्रदर्शनातून उपयुक्त माहिती मिळाली. आमचा बांधकाम साइट पाहण्याचा वेळ व खर्च वाचला. येथे चांगल्या ऑफर्स मिळत असल्याने ‘ऑन द स्पॉट बुकिंग’ करता आले.
- दीप्ती आवाडे

घर शोधणाऱ्यांसाठी घर खरेदीविषयीची सर्व आवश्‍यक माहिती येथे मिळते आहे. विविध गृहप्रकल्पांचे खूप छान प्रदर्शन आहे. पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, वाकड या ठिकाणी राबविलेल्या नव्या प्रोजेक्‍टची ‘युजफुल’ माहिती मिळाली. भेट देणाऱ्यांकडून भरून घेतलेल्या फॉर्मचा बांधकाम व्यावसायिकांनी पाठपुरावा करावा. 
- अमित वाघेरे

वास्तुशास्त्राचा प्रत्येकाने वापर करावा - मंडलेचा 
वास्तुशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्याचा वापर करावा, असा सल्ला प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ अशोक मंडलेचा यांनी दिला. ‘सकाळ’तर्फे आयोजित केलेल्या ‘सकाळ वास्तू प्रदर्शना’त सुखाची गुरुकिल्ली वास्तुशास्त्र या विषयावर त्यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती. 

वास्तू खरेदी करताना ती योग्य पद्धतीने घेणे आवश्‍यक आहे. वास्तूची खरेदी करताना त्यामध्ये दिशा पाहणे आवश्‍यक आहे. वास्तुशास्त्र हे आठ दिशांवर अवलंबून आहे, त्यामुळे त्याला अनुसरून घर, जागा घेणे आवश्‍यक असल्याचे मंडलेचा म्हणाले. वास्तू घेताना त्या ठिकाणी असणारी माती हादेखील महत्त्वाचा घटक असतो. माती ही पांढरी, हिरवी झाक असणारी, तांबूस आणि काळी अशा चार प्रकारांत असते. या मातीचे परीक्षण केल्यानंतर वास्तू घेतल्यास ती फायदेशीर ठरते. एखाद्या ठिकाणच्या मातीला सुगंध येत असेल तर त्या ठिकाणी भरघोस यश मिळते; तर मातीला दुर्गंधी येत असल्यास त्या ठिकाणी अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य, नैॡत्य, ईशान्य, आग्नेय या आठ दिशांवर पूर्णपणे वास्तुशास्त्र अवलंबून आहे. या सर्व दिशांचे फायदे आणि तोटे मंडलेचा यांनी नागरिकांना समजावून सांगितले. वास्तू ही स्वच्छ, प्रकाश, दोष नसणारी असावी. नागरिकांनी विचारलेल्या वास्तूविषयक प्रश्‍नांना मंडलेचा यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com