मुळा नदीत सात मजली खांब 

ज्ञानेश्‍वर बिजले
मंगळवार, 29 मे 2018

पिंपरी - मुळा नदीपात्रात हॅरिस पुलामधील मोकळ्या जागेतून मेट्रोचे 20 मीटर उंचीचे खांब उभारण्याचे आव्हानात्मक काम महामेट्रोने हाती घेतले आहे. पहिल्या खांबाचा पाया घेतला असून, तेथे सिमेंट कॉंक्रिटीकरणास सुरवात झाली. पाया भरणीचे काम पूर्ण करून खांबाचा तळातील एक भाग आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. या खांबांची जमिनीपासूनची उंची सर्वसाधारणपणे सात मजली इमारतीएवढी असेल. 

पिंपरी - मुळा नदीपात्रात हॅरिस पुलामधील मोकळ्या जागेतून मेट्रोचे 20 मीटर उंचीचे खांब उभारण्याचे आव्हानात्मक काम महामेट्रोने हाती घेतले आहे. पहिल्या खांबाचा पाया घेतला असून, तेथे सिमेंट कॉंक्रिटीकरणास सुरवात झाली. पाया भरणीचे काम पूर्ण करून खांबाचा तळातील एक भाग आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. या खांबांची जमिनीपासूनची उंची सर्वसाधारणपणे सात मजली इमारतीएवढी असेल. 

हॅरिस पुलाची शताब्दी पूर्ण झाली आहे. तेथे ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र पूल आहेत. त्यांच्यामध्ये 2.3 मीटर मोकळी जागा आहे. त्यालगत पुलावरील पादचारी मार्ग आहे. त्यानंतर वाहनांसाठी मार्ग आहे. दोन पुलाच्या मधून मेट्रोचे चार खांब उभारण्यात येणार आहेत. मेट्रोच्या खांबासाठी पाया खणताना जुन्या पुलाला धोका होऊ नये, या उद्देशाने जुन्या पुलाच्या खांबाजवळ मायक्रोपायलिंग करण्यात आले. तेथे सिमेंटची संरक्षक भिंत बांधली. त्यानंतर तेथे खडकापर्यंत पाया खोदण्यात आला. 

हॅरिस पुलापाशी नदीपात्र आणि लगतच्या भागात बारा खांब उभारण्यात येतील. नदीपात्रात चार खांब उभारणार असून, त्यांच्यामधील अंतर 43 मीटर आहे. त्यामुळे भक्कम पाया घेतल्यानंतर, हॅरिस पुलाच्या उंचीपर्यंत नेहमीच्या खांबापेक्षा जास्त जाडीचा खांब बांधण्यात येईल. त्या पहिल्या टप्प्याच्या खांबाची लांबी तीन मीटर आणि अडीच मीटर असेल. त्यावरील टप्प्यात अन्य खांबांप्रमाणे मेट्रोचा खांब दोन मीटर लांबी-रुंदीचा असेल. 

मेट्रोच्या नदीपात्रातील खांबाचे काम बोपोडीच्या बाजूला गेल्या महिन्यात सुरू केले होते. मात्र, महापालिकेचे हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचे काम त्या वेळी प्रगती पथावर होते. महापालिकेने हरकत घेतल्याने मेट्रोने बोपोडी बाजूला सुरू केलेले काम थांबविले. त्यानंतर महामेट्रोने दापोडी बाजूला मुळा नदीपात्रात काम सुरू केले. त्याच्या पायाचे काम सध्या सुरू आहे. येत्या पंधरवड्यात खांबाच्या तळाजवळील एक-दोन मीटर उंचीपर्यंत कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रातील काम थांबविण्यात येईल. नदीतील पाणीपातळी कमी झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा काम सुरू करण्यात येईल. पुढील वर्षीच्या मेपर्यंत नदीपात्रातील सर्व खांबांचे काम पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. 

खांबाचा पाया 
लांबी 12 मीटर 
रुंदी 9 मीटर 
खोली 5.5 मीटर 
दोन खांबांतील अंतर 43 मीटर 
खांबाची उंची 20 मीटर 

Web Title: pimpri news Seven floors pillars in the river of Mula