गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

निगडी - वाल्हेकरवाडीतील पुरवठा विभागाने छापा मारून 243 बेकायदा गॅस सिलिंडर जप्त केले. या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग होत होते. या कारवाईत चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. ही पुरवठा विभागाची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. 

निगडी - वाल्हेकरवाडीतील पुरवठा विभागाने छापा मारून 243 बेकायदा गॅस सिलिंडर जप्त केले. या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग होत होते. या कारवाईत चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. ही पुरवठा विभागाची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. 

वाल्हेकरवाडीच्या परिसरात सिलिंडरचे बेकायदा रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाल्याने परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या वेळी घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्‍यांमधून छोट्या गॅस टाक्‍यांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. चौघे जण हे काम करत होते. छापा टाकला त्या वेळी गॅसगळती अचानक सुरू झाली होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अग्निशमन बंब व पोलिसांना पाचारण करण्यात आले. वेळीच खबरदारी घेतल्याने गॅसगळती होऊनही पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन 243 विविध कंपन्यांचे सिलिंडर जप्त करण्यात आले. बालाजी पाटील नावाच्या व्यक्तीचा हा व्यवसाय असल्याचे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींनी पोलिसांना सांगितले. छापा टाकणाऱ्या दिनेश तावरे यांच्या पथकात गणेश सोमवंशी, प्रशांत ओहोळ, सुनील कास्टेवाड, संतोष लिमकर, बाबासाहेब ठोंबरे, श्रीराम गायकवाड यांचा समावेश होता. 

काय होत होते? 
विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो छोट्या सिलिंडरमध्ये भरून त्याची विक्री केली जात होती. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य येथे उपलब्ध होते. सकाळी आठपासून दुपारी चारपर्यंत अनेक महिने हे काम सुरू होते. 

अनर्थ टळला... 
छाप्याची कारवाई सुरू असताना काही टाक्‍यांमधून गॅसगळती सुरू असल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूचे रहिवासी व संभाव्य धोका ओळखून अग्निशमन बंब बोलावण्यात आला. 

पुरवठा विभागाने टाकलेले छापे 
काळेवाडी, पिंपरी, वायसीएम, वाल्हेकरवाडी, कास्पटेवस्ती, रहाटणी, पिंपळे सौदागर या उपनगरांत टपरीधारक, पथारीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. घरगुती वापराच्या गॅस टाक्‍या व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येत असल्याने ही कारवाई झाली आणि त्यात गॅस टाक्‍या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसात गुन्हे नोंद करण्यात आले नव्हते. जानेवारी-फेब्रुवारीत ही कारवाई प्रामुख्याने झाली. 

गॅस रिफिलिंगविरुद्ध कारवाई 
जानेवारी-फेब्रुवारीत गॅस रिफिलिंगविरुद्ध छापे टाकण्यात आले. यात रहाटणी फाट्यावरील छाप्यात आठ गॅस टाक्‍या जप्त करण्यात आल्या. वाल्हेकरवाडीत यापूर्वी टाकलेल्या छाप्यात नऊ गॅस टाक्‍या जप्त करण्यात आल्या. 

रिफिलिंगचे "अर्थ'कारण 
एका टाकीतून छोट्या टाक्‍यांत गॅस भरून त्या टाक्‍या व्यावसायिक कारणाने विकून नफा कमवायचा हे या धंद्यातील "अर्थ'कारण आहे. 

आर्थिक गणित कसे? 
व्यावसायिक गॅस टाकीतील गॅसचे वजन - 19 किलो 
या टाकीची किंमत - 1266 रुपये 
सवलतीनंतर किंमत - 1150 रुपये 
छोट्या टाक्‍या भरल्या जातात - 6 
एक टाकीत गॅस - 3 ते 4 किलो 
या टाकीची किंमत - साधारण 400 रुपये 
अंदाजित नफा प्रतिगॅस टाकी - 1200 ते 

घरगुती गॅस टाकी वजन - 14.2 किलो 
किती छोट्या भरल्या जातात - 4 
घरगुती गॅस टाकी किंमत - 645 रुपये 
छोट्या टाक्‍यांमधून होणारी कमाई - साधारण 800 ते 1000 रुपये 

टाक्‍या कोण वापरते? 
- टपरी व्यावसायिक 
- पथारीवाले 
- विद्यार्थी 
- परगावाहून आलेले मजूर 

धोका काय? 
रिफिल केलेल्या छोट्या टाक्‍या प्रमाणित व आयएसआय गुणवत्ता नसलेल्या असतात. त्यामुळे गॅसगळती होऊन स्फोटाची शक्‍यता. 

""बेकायदा साठा, वापर, रिफिलिंग, धोकादायक हाताळणी याविरोधात ही कारवाई करण्यात आली. येथील परिस्थिती पाहता मोठी दुर्घटना घडू शकली असती. आम्ही अशा कारवाया करीत असतो. यात एजन्सी अथवा कोणी झुकते माफ देतेय का? हे पाहणार आहोत. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार यापुढे छापे टाकले जातील.'' 
- दिनेश तावरे, परिमंडल अधिकारी, पुरवठा विभाग 

Web Title: pimpri news Unauthorized gas cylinders seized