आतातरी पाणीकपात रद्द होईल?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पिंपरी - पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने, पिंपरी-चिंचवड महापालिकेला दहा दिवस पुरेल एवढे पाणी धरणात जमा झाले. महापालिकेला १५ ऑक्‍टोबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आज धरणात आहे. त्यामुळे महापालिकेने सुरू ठेवलेली दहा टक्के पाणी कपात रद्द होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी ९८ मिलिमीटर, तर सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या दोन दिवसाच्या पावसामुळे जून महिन्यात ३३४ मिलिमीटर पाऊस पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडला. शनिवारी व रविवारीही जोरदार पाऊस झाल्याने, आज सकाळपर्यंत पाणीसाठ्यात ०.२१ अब्ज घनफूट (टीएमसी)ने भर पडली. महापालिकेने नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी रोज ०.०२ टीएमसी पाणी लागते.

पवना धरणात आज १.९३ टीएमसी (२२.७१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी २६ जूनला धरणात ०.९९ टीएमसी (११.६९ टक्के) पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पट पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाचे उपअभियंता नानासाहेब मठकरी म्हणाले, ‘‘चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणसाठ्यात पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. धरणातून सध्या वीजनिर्मिती आणि महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी रोज बाराशे क्‍युसेक (घनफूट प्रतिसेकंद) पाणी सोडण्यात येत आहे.’’

१२५ मिलिमीटर ‘पवना’त पाऊस
पवनानगर - पवनानगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सोमवार सकाळपर्यंत १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे भातखाचरे तुडुंब भरली होती. सोमवारी मात्र पावसाची दिवसभर भुरभूर सुरू होती.

पवनानगर परिसरात शनिवार रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला. पावसामुळे ओढे, नाले, ओहोळ व भातखचरे तुडुंब भरून वाहत होती. पावसाच्या पाण्यावर उगवलेल्या रोपांना जीवदान मिळाले, तर पाण्यावर पेरलेल्या रोपांची भातलावणी काही ठिकाणी जोमाने सुरू झाली आहे. 

Web Title: pimpri news water pcmc