गावाजवळच मिळतोय तरुणांना रोजगार

सुधीर साबळे
मंगळवार, 20 मार्च 2018

पिंपरी - पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी, बीपीओ कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांची पावले शहराकडे वळतात. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील द्वितीय श्रेणीतील सात शहरांमधील हे चित्र बदलताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेल्या "इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीम'मधून या शहरांत 13 नवीन कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यातून 12 हजार जणांना थेट नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे शहराजवळच्या गावांतील तरुणांना तिथेच काम मिळाल्याने मोठ्या शहरात जाऊन नोकरी मिळवण्याचा त्यांचा त्रास कमी झाल्याचे सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस्‌ ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी "सकाळ'ला सांगितले.

केंद्र सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत नव्या बीपीओ कंपन्यांना प्रोत्साहनासाठी "इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीम' सुरू केली. आयटी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात विकास असणाऱ्या पुणे, मुंबई या शहरांना वगळून भिवंडी, वर्धा, नाशिक, सांगली, औरंगाबाद, धुळे, नागपूर या शहरांसाठीच ही योजना लागू केली आहे. या शहरांत नजीकच्या काळात आणखीन दोन ते पाच कंपन्या सुरू होण्याची शक्‍यता आहे. प्रामुख्याने फ्रेशर उमेदवारांना त्याचा चांगला फायदा होतो आहे. या शहरांत आतापर्यंत सुरू झालेल्या बीपीओ कंपन्यांमध्ये हेल्थ, फायनान्स, इन्शुरन्स, डेटा प्रोसेसिंग, बॅक अँड प्रोसेसिंग यामधील कंपन्या आहेत.

केंद्र सरकारने या स्कीमअंतर्गत बीपीओ कंपनी सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर संबंधितांना नऊ महिन्यांच्या आत कंपनी सुरू करावी लागते. इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीमचा सकारात्मक परिणाम होत असून, त्यामुळे छोट्या शहरांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विकास, आर्थिक समृद्धी, महिला सक्षमीकरण, नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबवणे, असे अनेक फायदे होत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात योजना
- योजनेसाठी केंद्राची 493 कोटी रुपयांची तरतूद
- 2011 च्या जनगणनेनुसार देशभरात 48, 300 जागा निश्‍चित
- महाराष्ट्रात 3,900 जागा
- राज्यातील भिवंडी, वर्धा, नाशिक, सांगली, औरंगाबाद, धुळे, नागपूर या शहरांची निवड

13 12 हजार नवीन कंपन्या सुरू तरुणांना नोकरीची संधी

Web Title: pimpri news youth employment india bpo promotion scheme