पिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर तयार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पिंपरी - पिंपरी महापालिकेपासून निगडीपर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, तो सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी येथे मेट्रो स्थानके असतील, असे महामेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले. 

पिंपरी - पिंपरी महापालिकेपासून निगडीपर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, तो सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी येथे मेट्रो स्थानके असतील, असे महामेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले. 

मेट्रो निगडीपर्यंत असावी, अशी शहरातील नागरिकांची तसेच लोकप्रतिनिधींची सुरवातीपासून मागणी आहे. याबाबत बिऱ्हाडे म्हणाले, ""पिंपरी ते निगडीदरम्यानच्या मेट्रोच्या बांधकामासाठी सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार असून, त्याव्यतिरिक्त भूसंपादनाचा खर्च येईल. या प्रकल्पाला स्वतंत्र गाडीची गरज भासणार नाही. संत मदर तेरेसा पुलानंतर काळभोरनगरपाशी चिंचवड स्थानक असेल. खंडोबाचा माळ येथे आकुर्डी स्थानक असेल, तर निगडी बस स्थानकापाशी निगडी मेट्रो स्थानक असेल. फ्रान्सच्या सिट्रा या कंपनीने डीपीआर तयार केला आहे. गेले सहा महिने ते काम सुरू आहे.'' 

संरक्षण दलाकडून अद्याप परवानगी मिळालेली नसल्यामुळे हॅरिस पुलापासून बोपोडी व खडकीकडे मेट्रोचे काम सुरू होऊ शकले नाही. सध्या मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतच वेगाने सुरू आहे. दापोडीपासून पिंपरीपर्यंत दहा लेनचा रस्ता असल्यामुळे द्रुतगती मार्गावरील दुभाजकालगतचा नऊ मीटरचा रस्ता महामेट्रोने ताब्यात घेतला व गेल्या वर्षी कामाला सुरवात केली. या सहा किलोमीटरच्या अंतरात त्यांनी खांबांसाठी 188 पायाचे काम केले असून, 143 खांब उभारले आहेत. 

नाशिकफाटा येथे कासारवाडी रेल्वे स्थानकासमोर मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे. तेथे दोन हायड्रोलिक पाइल रिगच्या साह्याने फाउंडेशन घेण्यासाठी पायलिंग करण्यात येत आहे. पाइल फाउंडेशनच्या आधारे तेथे खांब उभारण्यात येणार आहेत. 

व्हायाडक्‍टचे काम वेगाने करण्यासाठी दापोडी येथे दुसरे गर्डर लॉंचर बसविण्यात आले आहे. त्याचे काम एक सप्टेंबरपासून सुरू होईल. तिसरे गर्डर लॉंचर ऑक्‍टोबरमध्ये बसविण्यात येईल. त्यानंतर व्हायाडक्‍टचे सुमारे दहा स्पॅन दरमहा होऊ शकतील. सध्या 23 स्पॅन पूर्ण झाले आहेत. स्पॅन उभारणीसाठी लागणारे 818 सेगमेंट तयार झाले आहेत, अशी माहिती बिऱ्हाडे यांनी दिली. 

430 वृक्षांची पुनर्लागवड 
महामेट्रोतर्फे 430 वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 253 वृक्ष आहेत. भोसरी व अन्यत्र ते वृक्ष लावण्यात आले. औंध, तळजाई, रेंजहिल्स, दिघीतील ग्रेप सेंटर या ठिकाणी पाच हजार दोनशे वृक्ष लावण्यात आले, असे गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले.

Web Title: Pimpri-Nigdi Metro DPR ready