झटका आलेल्या डॉक्‍टरला दारूडा समजून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पिंपरी - वाहन चालविताना ब्रेन स्ट्रोक (लकव्याचा झटका) आलेल्या डॉक्‍टरची मोटार समोरील मोटारीला धडकली. मात्र चालक दारूडा असल्याचे समजून नागरिकांनी कोणतीही शहानिशा न करता त्यांना बेदम मारहाण केली. डांगे चौकाजवळ दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. सध्या ते डॉक्‍टर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पिंपरी - वाहन चालविताना ब्रेन स्ट्रोक (लकव्याचा झटका) आलेल्या डॉक्‍टरची मोटार समोरील मोटारीला धडकली. मात्र चालक दारूडा असल्याचे समजून नागरिकांनी कोणतीही शहानिशा न करता त्यांना बेदम मारहाण केली. डांगे चौकाजवळ दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. सध्या ते डॉक्‍टर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एका नामांकित खासगी रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून काम करणाऱ्या डॉक्‍टरांचे थेरगाव-डांगे चौक परिसरात स्वतःचे रुग्णालय आहे. गुरुवारी ते आपल्या खासगी रुग्णालयातून नामांकित रुग्णालयात रुग्णांना तपासण्यासाठी चालले होते. डांगे चौकाजवळ त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मेंदूवरील नियंत्रण सुटले व चक्‍कर आली. त्यातच त्यांची मोटार अन्य एका मोटारीवर जाऊन धडकली व थांबली. 

पुढील मोटारीतील व्यक्‍ती भांडण करण्यासाठी आली. त्यावेळी ते डॉक्‍टर ग्लानी आलेल्या अवस्थेत होते. त्यांची मान हलत होती. अपघाताचा आवाज ऐकून बघ्यांची गर्दी जमली. मोटार धडकविणारे ते चालक डॉक्‍टर दारू प्यायले आहेत असे समजून जमावातील काही जणांनी त्यांना मारहाण
करण्यास सुरवात केली. ग्लानी आलेल्या अवस्थेतही ते हाताने
काहीतरी इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र मारहाण करणाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता मारहाण करणे सुरूच ठेवले.

बराचवेळ मारहाण केल्यावर गर्दीतील कोणीतरी त्या डॉक्‍टरांना ओळखले. ते डॉक्‍टर आहेत हे ऐकताच मारहाण करणारे पळून गेले. त्या डॉक्‍टरांना बेदम मारहाण झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्या ओळखीच्या लोकांनी डॉक्‍टरांना रुग्णालयात दाखल केले. आता त्या डॉक्‍टरांवर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

प्रत्येक अपघाताला चालकाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असतो, अशी ठाम समजूत नागरिकांची असते. मात्र अचानक उद्‌भवलेल्या शारीरिक कारणांमुळेही अपघात होऊ शकतात. यामुळे खरे कारण जाणून न घेता मारहाण करणे चुकीचे आहे. मारहाण झालेल्या डॉक्‍टरांना अचानक ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मेंदूवरील नियंत्रण सुटून अपघात झाला असावा.
- डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय अधिकारी- वायसीएम रुग्णालय

Web Title: pimpri pune news beating to doctor