राष्ट्रवाद्यांनो, भाजपवर भरोसा नाय काय?

मिलिंद वैद्य
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पिंपरी - राष्ट्रवाद्यांनो, तुमचा भाजपवर भरोसा नाय काय..., भाजपची आश्‍वासनं कशी गोल...गोल..., सत्ताधाऱ्यांचं काम कसं फोल...फोल... प्रकल्पांचा झालाय पहा बट्ट्याबोळ... राष्ट्रवाद्यांनो, तुमचा भाजपवर भरोसा नाय काय... असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेली विकासाची कामे सत्ताधाऱ्यांनी अडवून ठेवली आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय विकास माझा, असा प्रश्‍न शहरातील नागरिकांना पडला आहे.

महापालिकेत सत्तांतर झाले त्याला नऊ महिने होत आले. पण, या काळात शहरात नवा एकही प्रकल्प महापालिका राबवू शकली नाही. राष्ट्रवादीच्या काळात पिंपरी चिंचवडसाठी आंद्रा-भामा-आसखेड धरणांतून रोज पावणे दोनशे एमएलडी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय झाला होता. जलसंपदा विभागाने हे आरक्षणच रद्द केले. भाजपला हे पाणी मिळवता आले नाही. उपनगरांतील स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. वेळीच कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे.
पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याचे बोलले जात आहे. कारण, रिक्षावाल्यांना सीएनजी कीट बसविण्यासाठी दिलेले 16 लाख रुपयांचे धनादेश बॅंकेमध्ये वटलेच नाहीत. एवढी नामुष्की महापालिकेवर आली असेल तर इतर प्रकल्पांचे विचारायलाच नको. एकीकडे मेट्रोचे काम सुरू झाले त्यात महापालिकेच्या भाजपचे श्रेय शून्यच आहे. भक्ती-शक्ती उड्डाण पूल आणि ग्रेडसेपरेटरचे काम फक्त सुरू झाले आहे.

राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेल्या सुमारे दहाहून अधिक प्रकल्पांचा निधी अडविण्यात आला आहे. पण, त्यावर ना अधिकारी बोलतात, ना राष्ट्रवादीचे नगरसेवक. राष्ट्रवादी पालिकेत विरोधी पक्ष आहे. जे पूर्वी तावातावाने भांडायचे, ते आता तोंडात मिठाच्या गुळण्या धरून बसले आहेत. त्यामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. जेथे राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत, तिथे विकासकामे ठप्प असल्याचा आरोप त्या नगरसेवकांकडून केला जातो. भाजपकडून सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. असे असल्यास आंदोलने करायला, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवायला कोणी त्यांचा हात धरला आहे का, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. मंजूर प्रकल्प होतील म्हणून भाजपवर भरवसा ठेवला. आता त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रखडलेल्या प्रकल्पांचा पाढाच वाचून दाखविला आहे. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात जनतेचे मरण होत असल्याची भावना नागरिकांत आहे.

हे प्रकल्प रखडले
बंदिस्त जलवाहिनी योजना, आंद्रा भामा-आसखेडचे पाणी मिळविणे, बीआरटी मार्ग, भक्ती-शक्ती उद्यानातील सर्वांत उंच ध्वज उभारणे, झोपडपट्टी पुनर्वसन, घरकुल प्रकल्प (इडब्ल्यूएस प्रकल्प), डीअर सफारी पार्क, बर्ड व्हॅली लेझर शो, शाहूनगर येथील पीएमपी डेपो व बस स्थानक, भोसरीतील संत ज्ञानेश्‍वर व संत नामदेवांचे समूह शिल्प उभारणे, भोसरी, पिंपरी, थेरगावसह चार रुग्णालये उभारणे, भोसरी येथील लेझर शो, हॅरिस पुलाजवळील पर्यायी पूल, संत तुकारामनगर येथील बहुउद्देशीय इमारत उभारणे, पिंपरी येथील डेअरी फार्मजवळ रेल्वे उड्डाण पूल, बोपखेल येथील उड्डाण पूल आदी प्रकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कालावधीत मंजूर झाले. पण, काही कामांचे आदेश देऊनही त्यांचा निधी अडविण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी केला आहे.

Web Title: pimpri pune news bhajapwar bharosa nay kay