बोपोडीतील कोंडी सुटणार

ज्ञानेश्‍वर बिजले
मंगळवार, 27 मार्च 2018

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण सुरू केले आहे. मात्र, हा भाग सलग नाही. काही मिळकती संपादित कराव्या लागणार आहेत. त्याचे संपादन झाल्यास सुमारे एक किलोमीटरचा रुंद रस्ता वाहनचालकांना मिळेल. त्यातून ही कोंडी सुटण्यास मदत होऊ शकतो. याच भागात मेट्रो रेल्वेचे कामही एप्रिलमध्ये सुरू होईल. त्या वेळी रस्ता रुंदीकरण केलेला काही भाग वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकेल, अन्यथा येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागेल.

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण सुरू केले आहे. मात्र, हा भाग सलग नाही. काही मिळकती संपादित कराव्या लागणार आहेत. त्याचे संपादन झाल्यास सुमारे एक किलोमीटरचा रुंद रस्ता वाहनचालकांना मिळेल. त्यातून ही कोंडी सुटण्यास मदत होऊ शकतो. याच भागात मेट्रो रेल्वेचे कामही एप्रिलमध्ये सुरू होईल. त्या वेळी रस्ता रुंदीकरण केलेला काही भाग वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकेल, अन्यथा येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागेल.

हॅरिस पुलापासून खडकी कॅंटोन्मेंटपर्यंत सुमारे नऊशे मीटरचा रस्ता पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. रुंदीकरणाच्या जागेपैकी बोपोडी चौक परिसरातील पाच मिळकती अद्यापही महापालिकेच्या ताब्यात मिळालेल्या नाहीत. रुंदीकरणासाठी सुमारे ७५ टक्के जागा तडजोडीने महापालिकेच्या ताब्यात आली आहे. जागा मिळताच महापालिकेने तेथे सिमेंट क्राँक्रीटचा रस्ता बनविण्याला  प्राधान्य दिले. मात्र तो सलग भाग नाही. भूसंपादन विभागाकडून जागा ताब्यात देण्याचा निर्णय झाल्यास येथील रस्ता रुंदीकरणाचे काम करता येईल. हा सलग पट्टा हाती आल्यास, हॅरिस पुलापासून बोपोडी चौकात आल्यानंतर वाहनचालकांना किमान एक किलोमीटर अंतरासाठी पर्यायी रस्ता मिळू शकेल.

हॅरिस पूल ते अभियांत्रिकी महाविद्यालय यादरम्यानच्या ५.७ किलोमीटर अंतराचे रस्ता रुंदीकरण आणि मध्यभागी बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी महापालिकेने ८३ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. अभियांत्रिकी महाविद्यालय ते रेंज हिल्स चौक या पुणे महापालिकेच्या हद्दीतील अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ४२ मीटर रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तेथे रस्त्याच्या कडेला सायकलट्रॅक पूर्ण करण्यात येत आहे. 

मेट्रो प्रकल्पाचे काम खराळवाडीपासून दापोडीपर्यंत सुरू आहे. हॅरिस पुलाच्या मधल्या जागेतून मेट्रो प्रकल्पासाठी बारा खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन खांबांच्या पाया घेण्याचे काम नदीपात्रात नुकतेच सुरू झाले. एप्रिलमध्ये बोपोडी व खडकी येथील काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बोपोडी व खडकी येथे मेट्रोची दोन स्थानके आहेत. तेथून मेट्रो खडकी पोलिस ठाण्यापासून लोहमार्ग ओलांडून रेंजहिल्सकडे जाईल.

जागेसाठी पाठपुरावा
पुणे-मुंबई रस्ता खडकी कॅंटोन्मेंटमधील २.२ किलोमीटर जागेतून जातो. तेथे रस्त्याची रुंदी १८ ते २१ मीटर आहे. तेथे वाहनांच्या रांगा कायम लागलेल्या असतात. त्या ठिकाणी रस्ता रुंदी किमान ४२ मीटर आवश्‍यक आहे. ती जागा मिळविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले दीड वर्ष प्रयत्नशील आहेत. मेट्रो प्रकल्पालाही संरक्षण दलाची जागा हवी आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाबरोबरच महापालिकेलाही रस्ता रुंदीकरणासाठी जागा द्यावी आणि तेथील काम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी संरक्षण विभागाला पाठविले आहेत. संरक्षण विभागाच्या जागेवर काम करण्याची परवानगी लवकरच मिळेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांकडून बोपोडीतील पाच मालमत्तेचा ताबा घेण्याचा निर्णय लवकर झाल्यास येथील रस्ता रुंदीकरणाचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल. मेट्रो रेल्वेचा येथील मार्गाचा आराखडा या आठवड्यात अंतिम होईल. ती जागा निश्‍चिती झाल्यानंतर तेथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. संरक्षण विभागाकडून काम करण्याची परवानगी मिळाल्यास वर्षभरात हॅरिस पुलापासून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत ४२ मीटर रुंदीचा रस्ता होईल. त्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग करण्यात येईल. 
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका

Web Title: pimpri pune news bopodi road work