भाजप नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जावर शैक्षणिक माहिती खोटी दिल्याप्रकरणी पिंपळे निलख (प्रभाग 26-ब) मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक तुषार गजानन कामठे (वय 38) यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जावर शैक्षणिक माहिती खोटी दिल्याप्रकरणी पिंपळे निलख (प्रभाग 26-ब) मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक तुषार गजानन कामठे (वय 38) यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन मुरलीधर साठे (वय 44) यांनी फिर्याद दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-डेक्कन जिमखाना येथील मराठवाडा मित्र मंडळाचे ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात तुषार कामठे हे 1998-1999 शैक्षणिक वर्षात नापास झाले होते. मात्र, त्यांनी त्याच महाविद्यालयाचा त्याच शैक्षणिक वर्षात अकरावी पास झाल्याचा बनावट दाखला तयार करून सांगवीतील बाबूरावजी घोलप कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविला आणि ते बारावी पासही झाले. हीच शैक्षणिक माहिती उमेदवारी अर्जावर दिल्याने सचिन साठे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी साठे यांचा आक्षेप फेटाळून लावला होता. त्यानंतर निवडणुकीत तुषार कामठे विजयही झाले. 

मात्र, त्यानंतर याबाबत सचिन साठे यांनी माहिती अधिकारात सर्व माहिती काढून सांगवी पोलिस ठाण्यात तुषार कामठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर शुक्रवारी (ता. 27) कामठे यांच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. 

भाजपचा शहरातील दुसरा नगरसेवक 
यापूर्वी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्यावर निगडी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. आत्ता भाजपचेच नगरसेवक तुषार कामठे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. परंतु दोघांनाही अद्याप अटक झालेले नाही.

Web Title: pimpri pune news cheating crime on bjp corporator