‘विवाह सूचक’च्या नावाखाली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

पोलिसांची कारवाईला टाळाटाळ; माहिती कायद्याला केराची टोपली

पिंपरी - सोळा नंबर-थेरगाव येथील एका विवाह सूचक केंद्रामार्फत अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित व सामाजिक कार्यकर्त्यांकडून वाकड पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. 

पोलिसांची कारवाईला टाळाटाळ; माहिती कायद्याला केराची टोपली

पिंपरी - सोळा नंबर-थेरगाव येथील एका विवाह सूचक केंद्रामार्फत अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित व सामाजिक कार्यकर्त्यांकडून वाकड पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. 

लग्नासाठी इच्छुक असलेल्या अनेकांकडून नोंदणी; तसेच लग्न जमवण्यासाठी हजारो रुपये या विवाह सूचक केंद्राने उकळले आहेत. त्यामध्ये प्रौढ विधुरांचा समावेश असल्याने समाजात बदनामी होण्याच्या भीतीने अनेकजण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, हडपसरमधील एकाने सामाजिक कार्यकर्त्या कांचन दोडे यांच्यामार्फत पुढे येऊन वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गोरडे यांनी एप्रिल महिन्यात या केंद्राच्या चौकशीची मागणी वाकड पोलिस वरिष्ठ निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गोरडे यांनी ‘माहिती अधिकार’ कायद्यान्वये कारवाईची माहिती मागवली; परंतु पोलिसांनी माहिती कायद्याला केराची टोपली दाखवली. गोरडे यांनी परिमंडळ तीनचे उपायुक्त तथा प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे अपील केले. मात्र, जनमाहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती अर्जदाराला उपलब्ध करून दिली नाही, असे म्हटले असताना निकालपत्रात ही माहिती अपिलात सादर केल्याने अर्ज निकाली काढला जात असल्याचे म्हटले आहे. 

फसवणुकीची पद्धत
विवाहासाठी वधू-वर मिळतील, अशी जाहिरात करायची, त्यानंतर इच्छुकांनी संपर्क केल्यास नोंदणीचे सात हजार घ्यायचे. त्यानंतर त्याच किंवा दुसऱ्या दिवशी वयोगटानुसार मुलगी दाखवायची. मुलगी मात्र होकार देतेच. त्यानंतर लग्न जमविण्याचे काम हे मंडळच करते. लग्नासाठी खर्च दीड लाखाच्या आसपास सांगायचा. तडजोड करून साठ ते सत्तर हजारांवर खर्च येतो. पैसे रोख किंवा धनादेशाच्या स्वरूपात घेतले जातात. त्यानंतर मात्र मुलगी लग्नासाठी चालढकल करते. शेवटी वैतागून इच्छुक लग्न करण्याचे रद्द करतो. पैसे परत मिळणार नाहीत, काय करायचे ते करा, अशी धमकी या केंद्राकडून दिली जाते, असे पीडित सांगताहेत. 

याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील; तसेच फसवणूक झालेले पुढे आल्यास पोलिसांनाही काम करणे सोपे जाईल. 
-सुनील पिंजण, निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

विवाहासारख्या पवित्र नात्याच्या आडून असा गोरखधंदा चालत असेल, तर हे चुकीचे आहे. अशा विवाह सूचक केंद्रांवर कारवाई कारावी.  
-कांचन दोडे, सामाजिक कार्यकर्त्या, बिबवेवाडी

Web Title: pimpri pune news cheating by Wedding pointer center

टॅग्स