माजी सैनिकाच्या नातवाची हक्काच्या पैशांसाठी वणवण 

रवींद्र जगधने
बुधवार, 17 जानेवारी 2018

सर्वांत सुरक्षित ठिकाण असलेल्या बॅंकेतून अनोळखी व्यक्ती पैसे काढते. त्यानंतर ते मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. सरकार व बॅंकेने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. 
- कौशल गायकवाड

पिंपरी - बॅंकेत ठेवलेले पैसे सर्वांत सुरक्षित, असा प्रत्येकाचा विश्वास असतो. मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खात्यातील रक्‍कम कोणतीही व्यक्ती कोठूनही काढून घेऊ शकते. मात्र, पैसे परत मिळवण्यासाठी माजी सैनिकाच्या नातवाला वणवण करावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे. 

कौशल गायकवाड (वय 21) असे त्या नातवाचे नाव आहे. माजी सुभेदार शंकर जाधव हे त्याचे आजोबा (आईचे वडील) आहेत. सध्या तो मामाकडेच राहतो. तीन डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी त्याच्या महाराष्ट्र बॅंकेच्या खात्यातून अचानक 17 हजार काढल्याचा एसएमएस त्याच्या मोबाईलवर आला. त्याने कोणत्याही एटीएममधून पैसे काढले नाहीत, तरी खात्यातून पैसे लंपास झाल्याने कौशलला धक्का बसला. त्याने एटीएम कार्ड ब्लॉक केले. दुसऱ्या दिवशी बॅंकेच्या दापोडी शाखेत तक्रार देण्यासाठी गेला, तेव्हा बॅंकेने पोलिस एफआरआयची प्रत मागितली. त्यानंतर तो भोसरी ठाण्याच्या दापोडी चौकीत गेला. तेथे गुन्हा दाखल न करता फक्त तक्रार अर्जाची प्रत दिली. बॅंकेनेही तक्रार अर्ज स्वीकारून पैसे परत मिळतील, असे सांगितले. 

या धावपळीनंतर तो महिन्यानंतर पुन्हा बॅंकेत गेला, तेव्हा बॅंकेत तक्रार नोंद नसल्याचे त्याला सांगण्यात आले. काहीही चूक नसताना खात्यातून अज्ञात व्यक्ती पैसे काढून घेतो, याबाबत तक्रार देऊनही दखल घेत नसल्याने त्याने शिवाजीनगर येथील बॅंकेचे मुख्यालयात गाठले. तेथील आयटी अधिकाऱ्याने तक्रारीची ऑनलाइन नोंदणी करून घेतली व लवकरच पैसे परत मिळतील, असे सांगितले. बॅंकेत 25 ते 30 तक्रारी दररोज दाखल होतात. त्यातील पाच ते दहा तक्रारी खात्यातून पैसे काढलेल्यांच्या असतात. कौशल याच्या बॅंक खात्यातून कांचीपुरम येथील ऍक्‍सिस बॅंकेच्या एटीएममधून अज्ञाताने स्टीमर लावून पैसे काढले आहेत. बॅंकेला याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी कळवले आहे, असे महाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापनाने सांगितले.

Web Title: pimpri pune news ex serviceman money issue