अग्निशामक विभागाकडे पालिकेचे दुर्लक्ष

संदीप घिसे
गुरुवार, 29 मार्च 2018

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रस्तावित अग्निशामक केंद्र तातडीने उभारण्याची गरज आहे. तसेच मानधनावरील वाहन चालकांची तातडीने आवश्‍यकता असून, त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी

पिंपरी - प्रस्तावित अग्निशामक केंद्र उभारणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. मानधनावरील वाहनचालक नियुक्‍तीला खो बसला आहे. स्थायी समितीला केवळ खरेदीमध्ये रस आहे. असे प्रकार म्हणजे महापालिकेचे शहरातील नागरिकांच्या जिवाशी केलेला खेळच आहे.

शहराची लोकसंख्या २० लाखांवर आहे. लोकसंख्येच्या मानांकानुसार प्रतिलाख लोकसंख्येला एक आणि सुरवातीच्या तीन लाख लोकसंख्येला सहा याप्रमाणे २३ अग्निशामक केंद्रांची शहरात आवश्‍यकता आहे. 

प्रशासनाची चालढकल
गेल्या २८ फेब्रुवारीला मानधनावरील सहा वाहनचालकांची मुदत संपुष्टात आली. त्यापूर्वीच जानेवारी महिन्यात मानधनावरील सहा चालक आणि २३ फायरमन घेण्याचा प्रस्ताव अग्निशामक विभागाने प्रशासनाकडे दिला होता. फायरमनच्या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली. मात्र, वाहनचालकांचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

    सध्याचे केंद्र : संत तुकाराम नगर, भोसरी, प्राधिकरण, तळवडे, रहाटणी
    प्रस्तावित : चिखली, थेरगाव, चोविसावाडी, एमआयडीसी एफ-२ ब्लॉक, मोशी, चिंचवड, दापोडी, सांगवी, रिव्हररोड
    आणखी आवश्‍यकता : वाकड आणि रावेत
    सध्याचे मनुष्यबळ : १३२ कर्मचारी, ८ अधिकारी
    आवश्‍यक मनुष्यबळ : १७२ कर्मचारी, १० अधिकारी
    मानांकानुसार प्रतिकेंद्र : २५ कर्मचारी
    आवश्‍यक २३ उपकेंद्रांसाठी : ५७५ कर्मचारी

प्रस्तावित उपकेंद्रांची स्थिती
    चिखली : ९५ टक्‍के काम पूर्ण, पण पाण्याची टाकी नाही
    थेरगाव : बहुद्देशीय इमारतीचे काम प्रगतिपथावर
    एमआयडीसी : जागा ताब्यात
    मोशी : १० गुंठे जागा ताब्यात
    चोविसावाडी : १४ गुंठे जागा ताब्यात
    दापोडी : जागेचा न्यायालयीन वाद
    चिंचवड, रिव्हररोड, सांगवी : काहीच कार्यवाही नाही

वर्षनिहाय आगीच्या घटना
८८० - २०१४-१५
९०८ - २०१५-१६
९४४ - २०१६-१७

Web Title: pimpri pune news fire brigade department municipal ignore