संकल्प जलपर्णीमुक्त पवनेचा

रावेत - येथील नदीपात्रातील जलपर्णी काढताना कामगार.
रावेत - येथील नदीपात्रातील जलपर्णी काढताना कामगार.

पिंपरी - सामाजिक कामाच्या ध्येयाने झपाटलेल्या तरुणाने पवना नदी जलपर्णीमुक्‍त करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कामाला सामाजिक संस्थांनीही आर्थिक पाठबळ दिले आहे. एकेकाळी जलपर्णीमुळे हिरवीगार दिसणाऱ्या पवना नदीतील पाणी आता दिसू लागल्याने पवनामाईने स्वच्छतेचा ध्यास घेतलेला आहे. 

सोमनाथ मुसूडगे असे पवना जलपर्णीमुक्‍त करण्याचा संकल्प केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते रानजाई प्रकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यामुळे सावरकर मंडळातर्फे आयोजित ‘नदी वाचवा- जीवन वाचवा’ विषयावरील किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात १५ नोव्हेंबर रोजी वसुंधरा पुरस्कार मिळाला आहे.

जलपर्णी मुक्तीसाठी
सोमनाथ मुसडगे यांच्या संकल्पाला रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी आर्थिक पाठबळ दिले. दररोजचा ३२ मजुरांचे ५०० रुपयांप्रमाणे वेतन, कामगारांना देहूगाव येथून वाहनातून आणणे, दोनवेळा चहा आणि न्याहारी ही संस्था देत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नदीतून जलपर्णी काढण्याचे काम सुरू असते. डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण नदीतील जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण होणार आहे.

संस्थांचा सक्रिय सहभाग
रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी, पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरम, भावसार व्हीजन इंडिया, ज्येष्ठ नागरिक संघ, सुनील अण्णा शेळके मित्र परिवार, पोलिस नागरिक मित्र, निसर्ग मित्र-प्राधिकरण, शिवछत्रपती, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, मोरेश्‍वर भोंडवे यूथ फाउंडेशन, सचिन चिंचवडे यूथ फाउंडेशन, रानजाई, ज्ञानप्रबोधिनी पालक संघ (डॅशिंग डॅड), निरंकारी मंडळ, संस्कार प्रतिष्ठान, पवना मिशन, साई रेडिमिक्‍स काँक्रीट, कल्याणी एन्टरप्रायझेस यांच्यासह अनेक बचत गटांचा सहभाग आहे. 

जलपर्णीचे कारण
कोणते पाणी प्रदूषित झाले की त्यामध्ये जलपर्णी वाढण्यास सुरवात होते. या जलपर्णीला दूषित पाणी मिळाल्यानंतर इतर वनस्पतीच्या तुलनेत तिची तिप्पट वाढ होते. यामुळे अल्पावधीतच झपाट्याने वाढ झाल्याने नदी जलपर्णीमुळे हिरवीगार दिसू लागते.

जलपर्णीचा परिणाम
जलपर्णीची वाढ झाल्याने नदीतील पाण्याचा हवेशी संपर्क येत नाही. यामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच पाण्यात असलेल्या जलचरांचे जीवनही धोक्‍यात येते. हे पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास जादा खर्च येतो. मच्छरांचे प्रमाणही वाढल्याने रोगराईला निमंत्रण मिळते.

तिजोरीवर आर्थिक भार
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. गेल्यावर्षी त्यांच्यातील जलपर्णी काढण्यासाठी जवळपास ८५ लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, कामाचा ठेका घेणारे ठेकेदार पावसाची वाट पाहत बसतात. पाऊस आल्यावर जलपर्णी वाहून जाते आणि आयते पैसे ठेकेदारांना मिळतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र हेच काम रानजाई ही संस्था महापालिकेचा एकही पैसा न घेता सामाजिक संस्थांच्या पाठबळावर अवघ्या १२ लाखांत करणार आहे.

पवना नदी जलपर्णीमुक्‍त करण्याचा संकल्प केला आहे. नदी जलपर्णीमुक्‍त होत नाही, तोपर्यंत कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही.
- सोमनाथ मुसडगे, संस्थापक अध्यक्ष, रानजाई प्रकल्प संस्था

जलपर्णीमुक्‍त पवना नदीसाठी एक पॅटर्न तयार केला आहे. त्यात शहरातील सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे.
- प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com