सीसीटीव्हीमुळे मिळाली हरवलेली दागिन्यांची बॅग 

रवींद्र जगधने
बुधवार, 17 जानेवारी 2018

पिंपरी - प्रवासात रिक्षात विसरलेली दागिने ठेवलेली बॅग सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळालेल्या रिक्षा क्रमांकावरून, तसेच एका रिक्षाचालकाने केलेल्या मदतीमुळे परत मिळाली. बॅगेतील तब्बल तीन लाखांचे दागिने संबंधित रिक्षाचालकाने परत केले. अंबादास हराळे (रा. चिंचवड) असे दागिने परत करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे, तर जैनुद्दीन अब्बास शेख (रा. रुपीनगर सोसायटी, निगडी) असे संबंधित रिक्षा शोधणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. 

घटना गुरुवारी दुपारी दोनची. मोहन चौहान (रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांची मुलगी कार्यक्रम उरकून मुंबईला जाण्यासाठी परिवारासह चिंचवड रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या रिक्षांत रिव्हर रस्त्यावरून बसली. चिंचवड स्टेशन येथे गेल्यानंतर एका रिक्षाच्या डिक्कीत तब्बल तीन लाखांचे दागिने ठेवलेली बॅग विसरली. रिक्षावालाही निघून गेला. मात्र, दुसरी रिक्षा इतर परिवाराला घेऊन आल्यानंतर बॅग विसरल्याचे लक्षात आले. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे आल्याने ते मुंबईला निघून गेले. चौहान यांच्या मुलीने याबाबत घरच्यांना सांगितल्यानंतर तिचे काका अनिल लखन, भाऊ विनोद चौहान यांच्यासह नातेवाइकांनी रिक्षाची शोधाशोध सुरू केली. याप्रकरणी मोहननगर चौकीत तक्रारही दिली. दरम्यान, रिक्षाचालक हराळे याबाबत रेल्वे स्टेशनला आले; पण कोणीच भेटले नसल्याने ते बॅग घेऊन घरी गेले.

तोपर्यंत नातेवाइकांनी रिव्हर रस्त्यावरील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यामध्ये रिक्षा दिसत होती. मात्र, तिचा क्रमांक दिसत नसल्याने ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन पुणे आयुक्तालयातील तज्ज्ञांकडे गेले. त्याठिकाणी त्यांना रिक्षाचा क्रमांक व मालकाचे नाव, नेहरूनगरमधील पत्ता देण्यात आला. नातेवाइकांनी त्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली, असता संबंधित रिक्षा त्यांच्या नावावर नसल्याचे सांगण्यात आले. आता मात्र, नातेवाईक हतबल झाले. त्यांनी रिक्षाचा क्रमांक शहरातील सर्व रिक्षा थांब्यावर दिला. त्यापैकी जैनुद्दीन शेख या रिक्षाचालकाने दोन दिवस आपले मित्र व ओळखीच्यांना रिक्षाच्या क्रमांकाबाबत विचारल्यानंतर त्या रिक्षाचा मालक आकुर्डीत राहत असल्याची माहिती मिळाली. रविवारी (ता. 14) रिक्षा मालकाला शोधल्यानंतर ही रिक्षा त्याने सहा महिन्यांपूर्वीच हराळे यांना विकली असल्याचे सांगितले. याबाबत हराळे यांना संपर्क साधला असता, त्यांनी बॅग मोहननगर पोलिस चौकीत आणून दिली. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या समक्ष चौहान यांच्याकडे बॅग सुपूर्द करण्यात आली.

Web Title: pimpri pune news Lost jewellery bag received by CCTV