निगडीपर्यंत मेट्रोसाठी मिस्ड कॉल मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पिंपरी - पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास सत्ताधारी विलंब करत आहेत, या विरोधात आवाज उठवण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे मिस्ड कॉल मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी ०८०३०६३६४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे. 

पिंपरी - पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास सत्ताधारी विलंब करत आहेत, या विरोधात आवाज उठवण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे मिस्ड कॉल मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी ०८०३०६३६४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे. 

मेट्रो अगोदर पिंपरीपर्यंत सुरू होऊ द्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात येईल, अशी भूमिका पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे. बापट यांच्या या भूमिकेचा ’पीसीसीएफ’ संघटनेने निषेध केला होता. पालकमंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे ‘पीसीसीएफ’ संघटना आक्रमक झाली आहे. पीसीसीएफने वेळोवेळी मेट्रो संवादमध्ये सहभाग नोंदवून निगडीपर्यंत मेट्रो येण्याची गरज सांगितली होती. निगडी येथून पुण्यामध्ये शिक्षण व नोकरीसाठी जाणारा मोठा वर्ग आहे. यासाठी केवळ बस हे सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव माध्यम आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा शहरवासीयांना फायदा होणार नाही. त्यामुळे मेट्रोची खरी गरज ही निगडीपर्यंत आहे. फोरमतर्फे वेळोवेळी मानवी साखळीद्वारे शांततेत मागणीही करण्यात आली. तसे निवेदनही मेट्रो प्रशासन व महापालिकेला देण्यात आले होते. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास राज्य सरकारने २९ ऑक्‍टोबर २०१३ ला मंजुरी दिली आहे. तर, केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ ला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास काहीच हरकत नाही. तसेच मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, पालकमंत्री बापट यामध्ये खोडा घालत आहेत. पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत त्यांची ‘ना’ची भूमिका आहे.

पालकमंत्र्यामुळे विलंब
पालकमंत्री बापट आणि सत्ताधारी निगडीपर्यंत पहिल्याच टप्प्यात मेट्रो नेण्यास विलंब करत आहेत. याबाबत आवाज उठविण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे (पीसीसीएफ) ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरवासीयांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन ‘पीसीसीएफ’ने केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. पुणे मेट्रोची पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत किती आवश्‍यकता आहे, हे सरकारपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

Web Title: pimpri pune news missed call campaign for metro to nigdi