समांतर पूल झोपडपट्टीमुळे रेंगाळले

दापोडी - पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका यांच्यातर्फे पवना-मुळा नदीवर नवीन पूल उभारण्यात येत आहे. मात्र बोपोडीजवळील झोपडपट्टी न हटविल्याने काम संथ गतीने सुरू आहे.
दापोडी - पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका यांच्यातर्फे पवना-मुळा नदीवर नवीन पूल उभारण्यात येत आहे. मात्र बोपोडीजवळील झोपडपट्टी न हटविल्याने काम संथ गतीने सुरू आहे.

पिंपरी - पुणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी स्थलांतराचे काम रेंगाळल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन पूल बांधण्याच्या कामाची गती मंदावली आहे. 

हे पूल बांधल्यानंतर येथे रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल. पिंपरीकडून पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचे स्लॅब टाकण्याचे काम पावसाळ्यानंतर या आठवड्यात पुन्हा सुरू झाले. डिसेंबरअखेरपर्यंत झोपड्या स्थलांतरित करण्यात येतील, असे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरीमध्ये वाहने पुणे- मुंबई रस्त्यावर दहा लेनमधून ये- जा करतात. पिंपरीच्या हद्दीतून पुणे महापालिकेत प्रवेश करताना चार लेनच्या हॅरिस पुलावरून त्यांना मार्गस्थ व्हावे लागते. पुढे बोपोडी आणि खडकी कॅंटोन्मेंटमध्येही हा रस्ता जेमतेम चार लेनचा असल्याने तेथे वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी रोजच सकाळी- संध्याकाळी सीएमईच्या अलीकडेच वाहने अडकून पडतात. सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. संथ गतीने वाहने पुढे सरकतात. विश्रांतवाडीकडून खडकीमार्गे येणारी वाहने बोपोडी चौकात येतात. दोन्ही रस्त्यांनी येणाऱ्या असंख्य वाहनांमुळे या चौकात गर्दी होते. रांगेतील वाहनांना वाहतूक सिग्नल तीन-चार वेळा येऊन गेल्यानंतरच पुलावरून पुण्याकडे जाता येते. या कोंडीतून सुटका करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एकत्र येऊन हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचे ठरविले. पुलांचा खर्च दोन्ही महापालिका करणार आहेत.

बांधकामाची स्थिती
पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलाचे चाळीस टक्के काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले. पावसाळ्यात संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. नदीपात्रातील फाउंडेशनचे काम पूर्ण झाले. नदीपात्रात पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे, स्लॅबचे काम हाती घेता येत नव्हते. या आठवड्यात पुलाचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले आहे. झोपडपट्टी हलविण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला. त्याचे स्थलांतर झाल्यावरच हे पूल पूर्ण होतील. 

पुलाच्या जागी बाधित २६६ झोपड्या आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून पुरावे जमा केले. त्याची छाननी केली. तो प्रस्ताव पुणे महापालिकेच्या सहआयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर हडपसर आणि वारजे येथे करण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर लकी ड्रॉ काढून त्यांना जागेचा ताबा दिला जाईल. येत्या महिनाभरात स्थलांतराचे काम पूर्ण होईल.
- संदीप कदम, सहायक आयुक्त, औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालय

पावसाळ्यामुळे चार महिने पुलाचे काम करता आले नाही. नदीपात्रातील पुलाचे खांब झाले असले, तरी झोपडपट्टीच्या ठिकाणी दोन खांब उभे करावयाचे आहेत. झोपडपट्टीचे स्थलांतर झाल्यानंतर ते काम केले जाईल. पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या पुलाच्या स्लॅबचे काम सुरू केले.
- संदेश खडतरे, उपअभियंता, पिंपरी- चिंचवड महापालिका

कामाचा प्रारंभ - २३ मे २०१६
कालावधी - २४ महिने 
निविदा रक्कम - २४.३५ कोटी रुपये
पुलाची रुंदी - १०.५ मीटर
पुलाची लांबी  - ४०२ मीटर
नदीवरील पुलाची लांबी - २०२ मीटर
पुण्याकडील पोच रस्ता लांबी - ११५ मीटर
पिंपरीकडील पोच रस्ता लांबी - ८५ मीटर
पुलावरील पदपथ लांबी दोन मीटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com