पिंपळे सौदागरकरांची होणार कोंडीतून सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर आणि गोविंद-यशदा चौकात भुयारी मार्ग बांधण्यास ‘स्थायी’ची मंजुरी
पिंपरी - वाहतूक समस्येने हैराण झालेल्या पिंपळे सौदागरकरांसाठी आनंदवार्ता आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर व गोविंद-यशदा चौकात भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, लवकर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

अत्यंत वेगाने विकसित झालेला परिसर म्हणून पिंपळे सौदागरकडे बघितले जाते. येथील लोकसंख्येचा वेगही मोठा आहे. त्या तुलनेत रस्ते तोकडे पडू लागल्याने वाहतुकीची समस्या स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भुयारी मार्ग, ग्रेड सेपरेटरसारख्या पर्यायांचा विचार केला जावा, अशी येथील लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांकडून सातत्याने मागणी होत होती. स्थानिकांची मागणी आणि वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर अखेर महापालिकेने सुदर्शननगर व गोविंद चौकामध्ये अनुक्रमे ग्रेड सेपरेटर व भुयारी मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी १५ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

नाशिक फाटा ते वाकड या मार्गाचा आयटी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या रस्त्याचा वापर करणाऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी, तसेच वाहतुकीमध्ये सुसूत्रता यावी, या हेतूने या दोन्ही प्रकल्पांची आखणी केली आहे. भुयारी व ग्रेड सेपरेटर या मार्गामधून बीआरटी धावणार आहे. या प्रकल्पांमुळे या मार्गावरील वाहतूक ‘सिग्नल फ्री’ होऊन अधिक वेगवान होईल.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी

पिंपळे सौदागर परिसराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला आहे. त्यादृष्टीने या ठिकाणी अनेक विकास कामे वेगाने सुरू आहेत. पर्यायाने या ठिकाणी वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे गोविंद-यशदा चौकात व सुदर्शननगर चौकामध्ये ग्रेड सेपरेटर विकसित करण्यात यावे, अशी आमची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. त्यादृष्टीने पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता.
- शत्रुघ्न काटे, नगरसेवक

नाशिक फाटा - वाकड बीआरटी मार्गावर वाहतुकीचा ताण येत असल्याने पिंपळे सौदागरमधील चौकांमध्ये ग्रेड सेपरेटरसारखा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी आमची मागणी होती. 
- नाना काटे

Web Title: pimpri pune news pimple saudagar traffic free