शिवसेनेतच राहणार - आढळराव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पिंपरी - ‘‘मी शिवसेनेतच राहणार असून, आगामी निवडणुकीतही चांगले मताधिक्‍य मिळवून मीच निवडून येणार आहे,’’ असे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आढळराव पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणार असलेल्या चर्चेचे खंडन करताना ते बोलत होते. शहर दौऱ्यावर आले असताना आढळराव-पाटील ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.

पिंपरी - ‘‘मी शिवसेनेतच राहणार असून, आगामी निवडणुकीतही चांगले मताधिक्‍य मिळवून मीच निवडून येणार आहे,’’ असे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आढळराव पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणार असलेल्या चर्चेचे खंडन करताना ते बोलत होते. शहर दौऱ्यावर आले असताना आढळराव-पाटील ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.

भाजपची शिरूर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली असून, त्यांचे आमदारही संख्येने जास्त आहेत. त्यामुळे या वेळी अडचणी वाढतील का, अशी विचारणा केली असता, आढळराव म्हणाले, ‘‘गेल्या काही निवडणुकांत भाजपला यश मिळाल्याने सर्वच पक्ष अडचणीत आले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याने लोक संभ्रमात पडले. त्याची कारणे लोक तपासत आहेत. मात्र नोटाबंदी, गोहत्याबंदी यासारख्या विषयांमुळे भाजपची लोकप्रियता घटू लागली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयात आपल्याला खेळविले जात असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांत भोसरी विधानसभा मतदारसंघात मी आघाडी घेतली. येत्या निवडणुकीतही मी भोसरी परिसरात चाळीस हजारांचे मताधिक्‍य घेईन.’’

‘‘शिरूर आणि हडपसरमध्ये भाजपचे आमदार आहेत. मात्र, आता शिरूरमध्ये भाजपची ताकद घटली आहे. हडपसरमध्ये माझा आणि शिवसेनेचा संपर्क चांगला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राहिलेल्या खेड आळंदी, आंबेगाव आणि जुन्नर या तिन्ही मतदारसंघांत आधीपासूनच वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत काहीही करता येणार नाही. मुळात या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. तरीही मी लोकसभा निवडणुकीत सलग यश मिळविले. येत्या निवडणुकीतही यश मिळवायला आम्हाला काही अडचण येणार नाही,’’ असा दावा आढळराव यांनी केला. 

आढळराव म्हणाले, ‘‘शिवसेना सोडण्याबाबतच्या बातम्यांची दखल घेण्याची गरज वाटत नाही. खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयीही अशाच अफवा पसरविण्यात येत आहेत. सोशल मीडिया वाढल्यामुळे त्या आधारे काही लोक अशा बातम्या पसरवितात. मात्र, आम्ही दोघेही शिवसेनेतच राहणार आहोत. दोघांनीही मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्यामुळे आम्हाला निवडणुकीत काही अडचणी येणार नाहीत.’’

‘शहर पदाधिकाऱ्यांत दिवाळीपूर्वी बदल’
शिवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये; तसेच नेत्यांमध्ये येत्या दिवाळीपूर्वी बदल होणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले. शिवसेनेला नियोजन केल्यास चांगले यश मिळू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नवीन संपर्कप्रमुखही नियुक्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news shivajirao adhalrao in shivsena