शिवसेना शहरप्रमुख ठरणार दसऱ्यानंतरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शिवसेना शहरप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी हा निर्णय दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाल्यानंतर संपर्कप्रमुखांबरोबरच शहरप्रमुख बदलाचीही चर्चा सुरू झाली होती. आता दसरा मेळाव्यानंतर त्याला पूर्णविराम मिळेल, असे संकेत आहेत.

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शिवसेना शहरप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी हा निर्णय दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाल्यानंतर संपर्कप्रमुखांबरोबरच शहरप्रमुख बदलाचीही चर्चा सुरू झाली होती. आता दसरा मेळाव्यानंतर त्याला पूर्णविराम मिळेल, असे संकेत आहेत.

महापालिका निवडणुकीत शिवसेना नगरसेवकांची संख्या १४ वरून नऊवर आली. पक्षाला चांगले वातावरण असूनही त्याचा पुरेपूर उपयोग करून घेता आला नाही, अशी टीका झाली. संपर्कप्रमुख आणि शहरप्रमुख बदलासंबंधीचे विषय पुढे आले. संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला; पण शहरप्रमुखाची जबाबदारी राहुल कलाटे यांच्याकडेच राहिली आहे. दोन- अडीच वर्षांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कलाटे पुन्हा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. मतदारसंघाकडे लक्ष देता यावे यासाठी त्यांनी पक्षप्रमुखांकडे शहरप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या मुंबईतील बैठकीत चर्चा झाली नाही. परंतु, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव- पाटील यांच्या तयारीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. सोमवारीदेखील चर्चेसाठी त्यांना वेळ दिला आहे. खासदार राऊत प्रभारी संपर्कप्रमुख असल्याने त्यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा होऊ शकते. नियुक्तीबाबत निर्णय घाईने घेतला जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सध्या निर्णय अशक्‍य
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप अवधी आहे, त्यामुळे शिवसेनेला लगेच शहरप्रमुख नियुक्त करण्याची आवश्‍यकता नाही. परंतु, विधानसभेच्या तयारीसाठी विद्यमान शहरप्रमुख राहुल कलाटे वेळ देऊ इच्छित असल्याने या पदासाठी खासदार बारणे व आढळराव- पाटील यांच्याशी चर्चा करून पक्षप्रमुख दसरा मेळाव्यानंतर निर्णय घेऊ शकतात. सध्या मुंबईत मेळाव्याची तयारी सुरू असल्याने त्याअगोदर हा निर्णय होणे शक्‍य नाही. 

राज्यातील राजकीय हालचालींकडे पक्षाचे लक्ष आहे. त्यामुळे शहरप्रमुखपदासारख्या विषयावर निर्णय घेतला जाईल, अशी स्थिती नाही. पक्षप्रमुख तो निर्णय योग्यवेळी घेतील.
- श्रीरंग बारणे, खासदार, शिवसेना

Web Title: pimpri pune news shivsena city president selection after dasara