वाहतूक नियमनासाठी व्हॉट्‌सॲपचा वापर

रवींद्र जगधने
शुक्रवार, 28 जुलै 2017

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक नियमन व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक नियमन व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चौकात वाहतूक पोलिस, वॉर्डन नाही; वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, नियमभंग करणारे वाहनचालक, अनधिकृत वाहतूक यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत कोठे तक्रार करायची, केली तर त्याची दखल घेतली जाईल का, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतात. मात्र, नागरिकांच्या प्रश्‍नांना तत्काळ प्रतिसाद मिळण्यासाठी निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक पोलिस, वॉर्डन व परिसरातील सुजाण नागरिक यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला आहे. 

सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात चौक किंवा इतर कोठेही वाहतूक कोंडी, अपघात झाल्यास नागरिक ती माहिती व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पोस्ट करतात. त्याला त्वरित ग्रुपवरील पोलिस, अधिकारी प्रतिसाद देत घटनास्थळी दाखल होतात. एखाद्या चौकात पोलिस नसल्यास नागरिकांनी ग्रुपवर ‘चौकात पोलिस नाहीत, वाहतूक कोंडी झाली आहे,’ अशी माहिती टाकल्यास तत्काळ संबंधित नेमणूक केलेला पोलिस ग्रुपवर माहिती देतो, की मी लंघुशंकेला गेलो होतो किंवा इतर कामासाठी बाजूलाच होतो, मी सध्या चौकात आहे. त्यामुळे तक्रार करणाऱ्या नागरिकाच्या समस्येचे तत्काळ निरसन होते. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती मिळते. नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी हा परिसर सांगवी वाहतूक विभागाच्या अंतर्गत येत असून, म्हसवडे यांनी रुजू झाल्यानंतर सर्व सतरा सिग्नल सुरू केले.

नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, तसेच नागरिकांच्या सहभागाने वाहतूक नियमन सुरळीत व्हावे, यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- किशोर म्हसवडे, सांगवी वाहतूक विभाग

वाहतूक पोलिस व दक्ष नागरिक यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप हा चांगला उपक्रम आहे. नागरिकांनी नियमभंग करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र ग्रुपवर टाकल्यास वाहतूक विभागातर्फे कारवाई केली जाते. तसेच, कारवाईची माहिती ग्रुपवरच मिळते.
- पुरुषोत्तम पिंपळे, नागरिक

Web Title: pimpri pune news whatsapp use transport rules