पुण्यात टू-व्हिलरवरून जाणाऱ्या तरुणावर गोळीबार; कात्रज-कोंढवा रस्त्यावरची घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

विघ्नेश अशोक गोरे (वय 20 , रा. एसआरए इमारत, लेकटाऊन, कात्रज) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणावर दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने पिस्तुलातून गोळी झाडली. गोळी तरुणाच्या पायाला चाटून गेली असून त्यास गंभीर दुखापत झाली आहे.

ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कात्रज कोंढवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

शशिकांत शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा​

विघ्नेश अशोक गोरे (वय 20 , रा. एसआरए इमारत, लेकटाऊन, कात्रज) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विघ्नेश गोरेच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे, त्याचे मित्र अतुल दरेकर, ईश्वर म्हस्के आणि आणखी एक असे चौघेजण दोन दुचाकींवरुन शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाले होते. त्यांची दुचाकी आरएमडी शाळेसमोर आली, त्यावेळी समोरुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने गोरेवर पिस्तुलातून गोळी झाडली.

शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले; शरद पवारांना केली विनंती​

गोळी गोरेच्या मांडीला लागल्याने तो थोडक्‍यात बचावला. त्यानंतरही आरोपींनी गोरे याच्या दुचाकीचा पाठलाग करून त्यास शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pistol firing on youth who traveling by two wheeler in Pune