'कचरामुक्त शहराच्या दिशेने वाटचाल' विषयावर व्याख्यान

मिलिंद संगई
सोमवार, 16 एप्रिल 2018

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिबिंब अंतर्गत 'कचरामुक्त शहराच्या दिशेने वाटचाल' या विषयावर कोकरे बोलत होते. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे व फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कोकरे यांचा सत्कार झाला. 

बारामती - कचरा ही समस्या नसून राष्ट्रीय संपत्ती आहे. कचऱ्यापासून राज्यात दररोज अडीच हजार मेट्रीक टन जैविक खत तयार होऊ शकते, याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेती सुपिक बनेल व परकीय चलनही वाचेल, असे प्रतिपादन कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिबिंब अंतर्गत 'कचरामुक्त शहराच्या दिशेने वाटचाल' या विषयावर कोकरे बोलत होते. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे व फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कोकरे यांचा सत्कार झाला. 

कोकरे म्हणाले, उघड्यावर कचरा टाकू नका व कोणाला टाकू देऊ नका, कच-याचे वर्गीकरण करा व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर बंद करा, या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर कचरा समस्या चुटकीसरशी दूर होईल. स्वच्छतेच्या बाबतीत आजही आपण अशिक्षीत आहोत. घरापासून व घरातल्या प्रत्येकापासून कचरा वर्गीकरणास प्रारंभ झाला तर प्लॅस्टिकची समस्या पार दूर होईल. वेंगुर्ला नगरपालिकेत 27 प्रकारात कचरा वर्गीकरण करुन त्यापासून नगरपालिकेला उत्पन्न मिळवून दिले. 

प्लॅस्टिक हॉटमिक्स डांबर प्लॅटमध्ये मिसळून वेंगुर्ला येथे देशातील पहिला प्लॅस्टिक रस्ता बनविला व त्याचा दर्जा उत्तम आहे, रस्ते तयार करताना नगरपालिकेने टेंडरमध्ये प्लॅस्टिक रस्त्यांची अट आता घालायला हवी, असे कोकरे यांनी सांगितले. सामूहिक प्रयत्न झाले तर डंपिग ग्राऊंड मुक्त शहर सहज बनू शकते. 

प्लॅस्टिकबंदीसाठी जनजागृती करणे, पर्यायी पिशव्या उपलब्ध करुन देणे व कायद्याची कडक अंमलबजावणी करणे ही त्रिसूत्री वापरल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी ठरविले तर घरच्या घरीही कचरानिर्मूलन होऊ शकते, गरज आहे ती सर्वांनी या बाबत गांभीर्याने काम करण्याची. कचरा समस्या ही भयानक असून भविष्यात कच-यावरुन अराजकता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या मुळे प्रत्येक नगरपालिकेने या विषयावर धोरण ठरवून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: plastic and garbage free city program