#plasticBan रेल्वे स्थानकावर प्लॅस्टिकबंदीचा फज्जा ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असली, तरी पुणे रेल्वे स्थानकावर मात्र प्लॅस्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. प्रवाशांबरोबरच फेरीवाले, हॉटेल व्यावसायिकही प्लॅस्टिकचा वापर उदंडपणे करीत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, कारवाई तर कोसो दूर असल्याचे "सकाळ'च्या पाहणीत बुधवारी दिसून आले. 

पुणे - राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असली, तरी पुणे रेल्वे स्थानकावर मात्र प्लॅस्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. प्रवाशांबरोबरच फेरीवाले, हॉटेल व्यावसायिकही प्लॅस्टिकचा वापर उदंडपणे करीत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, कारवाई तर कोसो दूर असल्याचे "सकाळ'च्या पाहणीत बुधवारी दिसून आले. 

रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे एक लाख प्रवाशांची ये-जा होते. परंतु, राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होऊनही पुणे रेल्वेकडून त्याबाबत जनजागृतीसाठी कोणतेही उपाय योजण्यात आलेले नाहीत. स्थानकावरील काही हॉटेल व्यावसायिकांकडूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्रास वापरल्या जात आहेत, तर प्रवासीही प्लॅस्टिकचा मुक्तपणे वापर करीत असल्याचे दिसून आले. 

याबाबत रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता प्रवाशांकडून प्लॅस्टिकचा वापर कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. कमलबाई (नाव बदलले आहे) म्हणाल्या, ""स्थानकावरून गोळा केलेल्या कचऱ्यात निम्मा कचरा प्लॅस्टिकचा आहे. स्थानकावर अजूनही प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. प्रवासी बिनधास्तपणे प्लॅस्टिक वापरत असून, तोच कचरा आम्हाला साफ करावा लागत आहे.'' 

पार्सल विभागात प्लॅस्टिक नाही... 
रेल्वेच्या पार्सल विभागात प्लॅस्टिकचा वापर काही वर्षांपासून बंद असल्याचे चिफ पार्सल सुपरवाईजर विजय लोखंडे यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, ""पार्सलसाठी विभागाकडून प्लॅस्टिक वापरण्यात येत नाही. त्यात आता बंदीबाबत माहिती मिळाल्याने पार्सल बुकिंगसाठी येणाऱ्या प्रवाशांकडून प्लॅस्टिकचा वापर थांबवला असून, बंदी लागू झाल्यानंतर तर प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंदच आहे.'' 

रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही लक्ष देतोच; पण प्लॅस्टिक वापरणाऱ्या प्रवाशांवरही आमचे लक्ष आहे. प्रवाशांकडे प्लॅस्टिक आहे का, याची आम्ही आवर्जून पाहणी करत आहोत. 
- एम. डी. सोनावणे, सहायक उपनिरीक्षक, रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्स (आरपीएफ) 

बंदी लागू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला प्लॅस्टिक न वापरण्याबाबत आदेश दिले होते, त्यामुळे आम्ही पुस्तक विक्रेते प्लॅस्टिक वापरत नाही. काही स्थानकांवर काही जणांकडून प्लॅस्टिकचा वापर होत असेल. 
- दीपक सातव, पुस्तक विक्रेते 

पुणे परिसरातील सर्वच स्थानकांवर प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. परराज्यांतील आणि स्थानिक प्रवाशांकडूनही प्लॅस्टिक वापरले जात आहे. याबाबत रेल्वेकडून जनजागृती अथवा कारवाई होताना दिसत नाही. 
- नीलेश भोसले, प्रवासी

Web Title: #plasticBan Plastic use of Pune railway station